मुंबई - दरवर्षी जगामध्ये तृतीय पंथीयांवर झालेल्या अत्याचार व हिंसेमुळे ज्यांचा मृत्यू झालला आहे. अशा व्यक्तींच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी तसेच त्यांची आठवण म्हणून २० नोव्हेंबर हा दिवस 'INTERNATIONAL TRANSGENDER DAY OF REMEMBRANCE' (आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी स्मरण दिन) म्हणून साजरा करण्यात येतो. त्या निमित्ताने आज मुंबई पोलीसआयुक्तालय येथे तृतीय पंथियांच्या न्यायासाठी उल्लेखनिय काम करणाऱ्या LGBT च्या महाराष्ट्र अध्यक्षा प्रिया पाटील तसेच किन्नर माँ या एक सामाजिक संस्था ट्रस्ट व इतर संस्थांच्या १५ प्रतिनिधींचा खासदार सुप्रिया सुळे आणि पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमादरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी मनोगत व्यक्त करताना मुंबई पोलीसांकडून तृतीय पंथीयांना न्याय व मानसन्मान मिळावा या अनुषंगाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाबद्दल कौतुक केले. समाजात त्यांच्याप्रती जागृती निर्माण व्हावी, तसेच पोलीस व समाजातील इतर घटकांना याविषयी संवेनदशीलता निर्माण व्हावी यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांसाठी मुंबई पोलीसांचे आभार व्यक्त केले अशा प्रकारचे स्तुत्य कार्यक्रम महाराष्ट्रानेच प्रथम भारताला दिलेले आहेत अशा प्रकारे कौतुकोद्गार करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
अशाच प्रकारे पोलीस आयुक्त यांनी पोलीस दलातील सर्वांना समाजातील सर्व घटकांबद्दल आदर असल्याचे सांगून सर्व जुन्या समजुती बाजुला ठेवून नव्याने पोलीस दलाला संवेदनशील करून, त्यांच्यात जागृती निर्माण करून व त्यांना प्रशिक्षण देऊन आणखी चांगल्या प्रकारे काम करण्याचे आश्वासन दिले. तसेच समाजामध्ये बदल घडवून आणण्यासाठी पोलीस तसेच इतर घटक यांनी एकत्रित येऊन काम करण्याबाबत आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास विश्वास नांगरे पाटील, पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था), सुनिल कोल्हे, अपर पोलीस आयुक्त, विशेष शाखा उपस्थित होते.