मुंबई : दिवाळीनिमित्त मध्य, कोकण रेल्वे मार्गावरून विशेष एक्स्प्रेस सोडल्या आहेत. या एक्स्प्रेससह नेहमीच्या एक्स्प्रेस फुल्ल झाल्यात. दिवाळीतील प्रत्येक एक्स्प्रेसची एसी, नॉन एसीची प्रतीक्षा यादी ३०० ते ४००, एक हजार ते बाराशे आहे. तर, विशेष एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी ३० ते ४० आहे.
कोकणात जाण्यासाठी कोकणकन्या, जनशताब्दी, तेजस, राजधानी यासह विशेष एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी वाढली आहे. या एक्स्प्रेला प्रवाशांची जास्त पसंती आहे. त्यामुळे या गाड्या फुल्ल आहेत. काही विशेष एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांसाठी जागा उपलब्ध आहे. या विशेष गाड्यांचा प्रवाशांनी वापर करावा, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.
२५ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीदरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनसहून दर शुक्रवारी सकाळी ८.४५ वाजता थिविमसाठी गाडी सुटेल. ती थिविम येथे दुसºया दिवशी सकाळी १०.३० वाजता पोहोचेल. २७ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीदरम्यान थिविम येथून दर रविवारी दुपारी २.३० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनससाठी गाडी सुटेल. ती लोकमान्य टिळक टर्मिनसला दुसºया दिवशी पहाटे ३.४० वाजता पोहोचेल.
२६ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर या कालावधीमध्ये थिविमहून दर शनिवारी सकाळी ११.३० वाजता पनवेलसाठी गाडी सुटेल. ती पनवेल येथे त्याच दिवशी रात्री ११.१५ वाजता पोहोचले. तर, २६ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर या कालावधीत पनवेलहून दर शनिवारी रात्री ११.५५ वाजता थिविमसाठी गाडी सुटेल. ती थिविम येथे दुसºया दिवशी दुपारी १२ वाजता पोहोचेल.
जादा विशेष गाड्यांची व्यवस्था
दिवाळीनिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी जादा विशेष गाड्यांची व्यवस्था करण्याचा निर्णय मध्य आणि कोकण रेल्वेने घेतला. २५ आॅक्टोबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीमध्ये लोकमान्य टिळक टर्मिनसहून दर शुक्रवारी रात्री १.१० वाजता करमळीसाठी गाडी सुटेल. ही गाडी त्याच दिवशी करमळी येथे दुपारी १.३० वाजता पोहोचेल. तर, करमळीहून दर शुक्रवारी दुपारी २ वाजता गाडी सुटेल. ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसला पहाटे ३.४० ला पोहोचेल.
तुतारी एक्स्प्रेसला जादा डबे
तुतारी एक्स्प्रेसच्या दादर स्थानकातील फलाट क्रमांकात बदल करण्यात आला आहे. यासह तात्पुरत्या कालावधीसाठी तुतारी एक्स्प्रेसला जादा डबे जोडण्यात येणार आहे. त्यामुळे दिवाळीतील जादा गर्दी विभाजित करता येईल. शिवाय यामुळे दिवाळीनिमित्त गावी जाणाºया प्रवाशांचीही सोय होणार आहे. गाडी क्रमांक ११००३-०४ दादर ते सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस दादर स्थानकातील फलाट क्रमांक ५ वरुन रात्री १२ वाजून ५ मिनिटांनी सुटणार आहे.
सावंतवाडीहून येणारी तुतारी एक्स्प्रेस दादर स्थानकात फलाट ५ वर सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी येईल. या एक्स्प्रेस स्लीपर क्लासचा एक आणि सामान्य द्वितीय क्लासचे ३ डबे जादा जोडण्यात येणार आहेत. २३ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत तुतारी एक्स्प्रेसला बदल करण्यात आले आहेत.