मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) मुंबईमध्ये विविध मेट्रो मार्गिकांचे जाळे विस्तारण्यात येणार आहे. या मेट्रो मार्गिकांवर धावणाऱ्या मेट्रोच्या डब्यांमध्ये दिव्यांगांचाही विचार करण्यात आला आहे़ त्यांच्यासाठी या डब्यांमध्ये विशेष सोयीही करण्यात आल्या असल्याचे एमएमआरडीएमार्फत सांगण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो-१०, मेट्रो-११, मेट्रो-१२ या तीन मेट्रो मार्गिकांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी वांद्रे-कुर्ला संकुलामध्ये (बीकेसी) मेक-इन-इंडिया कार्यक्रमांतर्गत बनवण्यात आलेला पहिला मेट्रो कोचही प्रदर्शनासाठी ठेवण्यात आला होता. आपल्या देशामध्येच हे कोच तयार करण्यात येणार आहेत़ मेट्रोमध्ये कोणकोणत्या सुविधा असतील हे कोचमध्ये दाखवण्यात आले आहे. कोचमध्ये अत्याधुनिक सेवासुविधा देण्यात आल्या आहेत़ दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष सोयी पुरवण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या सायकली टांगण्याची व्यवस्थाही यामध्ये करण्यात आली आहे. दरवाजे,निरीक्षण, अडथळे, धूर, आग यासाठी स्वयंचलित यंत्रणा आहेत. स्थानकांवरील उद्वाहनांवर अंधांसाठी ब्रेल बटने असणार आहेत.
मेट्रो स्थानकांवर प्रवाशांची धक्काबुक्की आणि त्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर, स्वयंचलित अग्नीशोधक आणि अग्नीशमन यंत्रणा, घुसखोरी आणि नजरेआड असणारे अडथळे शोधणारी स्वयंचलित यंत्रणा स्थानकांवर उपलब्ध करण्यात येणार आहे. स्थानकावरील सरकते जिने पर्यावरण जपणारे आहेत, स्थानकावर सोलार उर्जा वापरून एल.ई.डी.फिटिंग्ज असेल, असे एमएमआरडीएमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.