ससून वाचनालयात साहित्यप्रेमींसाठी विशेष महोत्सव

By admin | Published: February 20, 2017 04:26 AM2017-02-20T04:26:08+5:302017-02-20T04:26:08+5:30

डेव्हिड ससून वाचनालयात ७० हजारांहून अधिक पुस्तकांचा वारसा जवळून पाहायला मिळतो, ही त्यांच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे

Special Festival for Literature in Sasoon Reading | ससून वाचनालयात साहित्यप्रेमींसाठी विशेष महोत्सव

ससून वाचनालयात साहित्यप्रेमींसाठी विशेष महोत्सव

Next

मुंबई : डेव्हिड ससून वाचनालयात ७० हजारांहून अधिक पुस्तकांचा वारसा जवळून पाहायला मिळतो, ही त्यांच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. या नेत्रदीपक वाचनालयाच्या संस्थापक स्मृती सप्ताहाची सुरुवात १५ फेब्रुवारी रोजी करण्यात आली असून, २१ फेब्रुवारी रोजी वाचनालयाचा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. या वाचनालयाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय घटनेच्या लेखनातील अंतिम भाग या वाचनालयात बसून पूर्ण केला होता.
संस्थापन स्मृती सप्ताहानिमित्त वाचनालयातर्फे सर्वसामान्य लोकांनाही उपस्थित राहता येईल, असे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. यात सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रांतील समस्या आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य करणारी नाटके, भाषणे तसेच विविध सामाजिक क्षेत्रांतील प्रसिद्ध व्यक्तींचे परिसंवाद या उपक्रमांचा समावेश होणार आहे. यामध्ये सादर होणाऱ्या नाटुकल्यांमध्ये अमलीपदार्थांचे दुष्परिणाम या विषयावरील डॉ. राजेश साखरे यांची एकांकिका तसेच, गुन्हे अन्वेषण विभागामध्ये न्यायवैद्यक विषयाचे वाढते महत्त्व सांगणारी मुंबई विद्यापीठाच्या कायदा विभागाच्या प्रमुख रश्मी ओझा यांची नाटुकली यांचा समावेश आहे. तसेच तणाव व्यवस्थापन, सांगीतिक कार्यक्रम, बासरीवादन, गुजराती व मराठी काव्यवाचन या विविध उपक्रमांचा समावेश या सप्ताहात करण्यात
आला आहे.
या वाचनालयाला वाचनालयाच्या व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष कौशिक ओझा यांनी आर्थिक साहाय्य देऊ केले आहे. इतिहासात पहिल्यांदाच, डेव्हिड ससून वाचनालयाच्या फेसबूक पानावर या सप्ताहाचे लाइव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
वाचनालयाचे संपूर्णत: डिजिटायझेशन करण्यात आले असून, सर्व पुस्तकांची क्रमवार नोंदणी आमच्या संकेतस्थळावर करण्यात आली आहे. यामुळे वाचकांना आपापल्या पसंतीची पुस्तके निवडणे सोपे झाले आहे. प्रत्येक पुस्तकाच्या पहिल्या व शेवटच्या पानावरील संहितेचे थोडक्यात स्वरूप संकेतस्थळावर टाकून वाचकांना त्या पुस्तकाचा सारांश कळण्यासाठी आम्ही विशेष परिश्रम घेत आहोत. वाचनालयाची ही वास्तू लवकरात लवकर दुरुस्त व अत्याधुनिक करण्याचे आमचे येत्या काळातील प्राथमिक ध्येय असून, त्यासाठी काळाघोडा असोसिएशनतर्फे २८ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. ही वास्तू भारताच्या ऐतिहासिक वारशांमध्ये गणली जात असल्याने या दुरुस्तीसाठी सरकारी परवानग्यांची आवश्यकता लागणार आहे. त्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया आधीच सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती वाचनालयाच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व व्यावसायिक सीए हेमंत भालेकर यांनी दिली. पुढच्या वर्षी आणखी मोठ्या व्यासपीठावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा वाचनालयाचा विचार असल्याचेही त्यांनी
सांगितले. (प्रतिनिधी)

अशी झाली स्थापना...
१८४७ साली रॉयल मिंट आणि डॉकयार्डच्या फोरमन्स, यांत्रिकांनी एकत्र येऊन मेकॅनिक संस्थेची व वाचनालयाची स्थापना केली होती. जी. कॅम्पबेल आणि जी.ई. गोल्सींग यांच्या आराखड्यानुसार तयार झालेल्या इमारतीस १ लाख २५ हजार रुपये खर्च आला होता. त्यापैकी ६० हजार रुपये डेव्हिड ससून यांनी दिले होते.
१८६५ साली डेव्हिड ससून यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर सर बार्टल फ्रीअर यांच्या हस्ते करण्यात आले. मालाड स्टोनमध्ये बांधलेली इमारत आजही काळाघोडा परिसरामध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेते.

डेव्हिड ससून यांच्याबद्दल
 डेव्हिड ससून यांचा जन्म बगदादमध्ये १७९२ साली झाला होता. तेथील छळाला कंटाळून ज्या ज्यू कुटुंबांनी स्थलांतर केले त्यामध्ये ससून कुटुंबांचा समावेश होता. साधारणत: १८३२ साली ते मुंबईमध्ये आले. त्यानंतर त्यांनी चीनशी आणि मध्य पूर्वेतल्या देशांशी अफू आणि कापडाचा व्यापार सुरू केला.
 मुंबईतील मागेन डेव्हिड आणि पुण्यातील ओहेल डेव्हिड सिनेगॉग ससून यांनीच स्थापन केले. मुंबई आणि पुण्यातील रुग्णालये, शाळा, महाविद्यालये बांधण्यासाठीही त्यांनी योगदान दिले. त्यांना एलियास, अल्बर्ट आणि ससून डेव्हिड हे मुलगे होते. त्यातील अल्बर्ट यांच्या प्रयत्नांमधून ससून डॉकची स्थापना करण्यात आली. डेव्हिड ससून यांचा मृत्यू १८६४ साली पुण्यात झाला.

Web Title: Special Festival for Literature in Sasoon Reading

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.