मुंबई : वांशिक हिंसाचारात होरपळत असलेल्या मणिपूरमध्ये राज्यातील विविध भागातील विद्यार्थी अडकले आहेत. या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. या विद्यार्थ्यांना योग्य ती सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी विनंती शिंदे यांनी या दाेघांनाही केली आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी बंगळुरू येथून मणिपूरमधील मराठी विद्यार्थ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. यातील १४ विद्यार्थ्यांना मणिपूर येथील शिवसेना भवनात सुखरूप आणण्यात आले आहे, तर उर्वरित ८ विद्यार्थ्यांना लवकरच आणण्यात येणार आहे. या २२ विद्यार्थ्यांना आसाममध्ये आणले जाणार आहे. तेथून विशेष विमानाने महाराष्ट्रात आणण्यात येणार आहे.
पालकांनी घेतली पवारांची भेट
मणिपूर येथील आयआयआयटी संस्थेत अजूनही काही विद्यार्थी अडकलेले आहेत. या विद्यार्थ्यांचे पालक मला भेटले. मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहे, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले.
कर्नाटकात प्रचारतोफा आज थंडावणार, सत्ता टिकवण्यासाठी भाजपची शक्ती पणाला
अजित पवारांचे राज्य सरकारला पत्र
मणिपूर येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांबाबत विरोधी पक्षनेता या नात्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्र दिले आहे.
या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे महाराष्ट्रात आणण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारशी बोलावे. याबाबत मला ज्या अडचणी वाटत होत्या, त्या मी पत्रामध्ये मांडल्या आहेत, असे अजित पवार यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांचाही विद्यार्थ्यांना फोन
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना फोन करून त्यांच्याशी चर्चा केली आणि काळजी करू नका, अशा शब्दात त्यांना आश्वस्त केले. तसेच सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.
यासंदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांनी मणिपूर पोलिस महासंचालकांना संपर्क केला आहे. फडणवीस यांनीही तत्काळ मणिपूर सरकारशी संपर्क केला आणि या विद्यार्थ्यांना तत्काळ, परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत सुरक्षित वातावरणात ठेवण्याची विनंती केली.