दसरा मेळाव्यासाठी निवृत्त पोलिसांची ‘विशेष’ फौज तैनात; २० हजार पोलिसांचा फौजफाटा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 05:43 AM2022-10-05T05:43:06+5:302022-10-05T05:43:39+5:30
दसरा मेळाव्याच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: दसरा मेळाव्याच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईपोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच पोलिसांच्या दिमतीला वर्षभरात निवृत्त पोलिसांची विशेष फौजदेखील तैनात करण्यात आली आहे.
स्थानिक कार्यकर्ते, खबऱ्यांमार्फत पोलीस अंदाज घेत आहेत. परिमंडळ उपायुक्तांनी वर्षभरात निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांची मेळाव्यात विशेष पोलीस अधिकारी म्हणून नियुक्त करावी, असे आदेश जारी केले आहेत. बीकेसी मैदानात मुंबई पोलिसांसाठी एक मॉनिटर रूम तयार करण्यात आली आहे.
२० हजार पोलिसांचा फौजफाटा
एकाच वेळी होणाऱ्या दोन मेळाव्यांना कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये यासाठी बंदोबस्तासाठी ३२०० अधिकारी, १५ हजार २०० पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाचे १५०० जवान, एक हजार गृहरक्षक दल, शीघ्रकृती दलाच्या २० पथके, १५ बॉम्ब शोधक व नाशक पथके तैनात करण्यात येणार आहेत. सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह दोन्ही ठिकाणी भेटी देऊन पोलिसांच्या तयारीची पाहणी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"