अमित शहांच्या स्वागतासाठी मातोश्रीवर गुजराती मेन्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 03:03 PM2018-06-06T15:03:51+5:302018-06-06T15:03:51+5:30
उद्धव ठाकरे आणि अमित शहा या दोघांमध्ये दुरावा असला तरी मातोश्रीवर त्यांच्या पाहुणचारात कोणतीही कसूर सोडण्यात आलेली नाही.
मुंबई: भाजपाध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीची सध्या प्रचंड चर्चा रंगली आहे. या भेटीबद्दल अद्याप दोन्ही पक्षांकडून जाहीर वाच्यता करण्यात आलेली नाही. त्यामुळे बुधवारी सकाळपासून या भेटीबाबत काहीसे संभ्रमाचे वातावरण आहे.
मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार अमित शहा यांची मातोश्री भेट पक्की आहे. यासाठी शिवसेनेकडून जोरदार तयारीही सुरू झाली आहे. अमित शहांच्या आजच्या दौऱ्याच्या कार्यक्रमपत्रिकेवर मातोश्रीचा कोणताही उल्लेख नव्हता. मात्र, शिवसेनेच्या गोटातून आलेल्या विश्वसनीय माहितीनुसार उद्धव ठाकरे यांनी कालच अमित शहा यांच्या भेटीसाठी वेळ राखून ठेवली आहे. तसेच सध्या अमित शहांची सरबराई करण्यासाठी मातोश्रीवर जोरदार तयारी आहे. उद्धव ठाकरे आणि अमित शहा या दोघांमध्ये दुरावा असला तरी मातोश्रीवर त्यांच्या पाहुणचारात कोणतीही कसूर सोडण्यात आलेली नाही. त्यामुळेच अमित शहांसाठी मातोश्रीवर खास गुजराती खाद्यपदार्थ असलेला मेन्यू ठरवण्यात आला आहे. या मेन्यूमध्ये ढोकळा, खांडवी आणि गाठीचा समावेश आहे. त्यामुळे आता या आदरातिथ्यामुळे उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यातील दुरावा कमी होणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
आज सकाळी 12.30च्या सुमारास अमित शहा यांचे मुंबई विमानतळावर आगमन झाले. मुंबईत आल्यानंतर वांद्र्याच्या रंगशारदा येथे त्यांनी भाजपा नेत्यांसोबत बैठक घेतली. यानंतर त्यांनी जुहू येथे जाऊन अभिनेत्री माधुरी दीक्षितची भेट घेतली. यावेळी अमित शहांनी माधुरी दीक्षितला राज्यसभेची ऑफर दिल्याचीही चर्चा आहे. मात्र, भाजपाने हे वृत्त फेटाळून लावले आहे. यानंतर अमित शहा सह्याद्री अतिथीगृहावर जातील. याठिकाणी ते काही भाजपा नेत्यांच्या भेटीगाठी घेतील. दुपारी साडेचार वाजता ते पेडर रोडवरील रतन टाटा यांच्या निवासस्थानी जातील. त्यानंतर साधारण साडेपाचच्या सुमारास ते लता मंगेशकर यांचे निवासस्थान असलेल्या 'प्रभूकुंज' येथे जातील. याठिकाणी काही काळ थांबून अमित शहा संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास सिद्धीविनायक मंदिर आणि त्यानंतर वांद्र्यातील आशिष शेलार यांच्या निवासस्थानी जाणे अपेक्षित आहे. कार्यक्रम पत्रिकेनुसार साडेसात ते पावणेनऊ या वेळेत अमित शहा शेलारांच्या घरी असतील. या सव्वातासाच्या काळात काही वेळ ऐनवेळच्या कार्यक्रमांसाठी राखून ठेवण्यात आला आहे. याच वेळेत अमित शहा मातोश्रीवर जातील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.