मुंबई : मुंबईत राज्य सरकारतर्फे नेत्रविकारांसाठी विशेष नेत्र रुग्णालय उभारले जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गुरुवारी याबाबतचे निर्देश प्रशासनला दिले आहेत. मुंबईतील आरोग्य सुविधांचा दर्जा वाढावा यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात गुरुवारी आढावा बैठक पार पडली.
मुंबईकरांना दर्जेदार वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी उपलब्ध आरोग्य सुविधांचा पुनर्विकास जलदगतीने करण्यात यावा. मुंबईत सध्या महापालिकेमार्फत १९ उपनगरीय रुग्णालयांचे बांधकाम सुरू असून, ते लवकरात लवकर पूर्ण करावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले. बोरीवली येथील भगवती रुग्णालय, गोरोगाव येथील सिद्धार्थ रुग्णालय, वांद्रे येथील खुरशादजी बेहरामजी भाभा रुग्णालय, मुलुंड येथील अगरवाल रुग्णालय, विक्रोळी येथील क्रांतिवीर महात्मा जोतिबा फुले रुग्णालय, गोवंडी येथील शताब्दी रुग्णालय, राजावाडी या रुग्णालयांच्या पुनर्विकासाची कामे सुरू आहेत. तर चांदिवली येथे संघर्षनगर, कांदिवली येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुपरस्पेशालिटी रुग्णालय, नाहूर येथे भांडूप मल्टिस्पेशालिटी हे नवीन प्रकल्प सुरू करण्यात आले आहे.
विक्रोळीतील क्रांतिवीर महात्मा फुले जोतिबा फुले रुग्णालयाचे पुनर्विकासाचे काम करताना त्याठिकाणी ५०० खाटांची सुविधा करावी. त्याचबरोबर तेथे सुपरस्पेशालिटी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. या रुग्णालयाचे काम होईपर्यंत या भागातील रुग्णांना शुश्रूषा रुग्णालयामध्ये उपचार देण्यात यावेत, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना केल्या आहेत.
रुग्णांच्या नातेवाइकांसाठी म्हाडा वसाहतीत खोल्यादेशभरातून कर्करोगाच्या उपचारासाठी मोठ्या संख्येने रुग्ण टाटा रुग्णालयात येतात. रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांसाठी निवासाची सोय व्हावी, यासाठी लोकमान्य नगरमधील म्हाडा वसाहतीत खोल्या उपलब्ध करून द्याव्यात. त्याचबरोबर सायन, सांताक्रुझ येथे अशा प्रकारची सोय करण्यासाठी मुंबई महापालिकेने देखील पुढाकार घ्यावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
मुंबई महापालिकेमार्फत सध्या केईएम, सायन, नायर, कूपर हे रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालये आणि नायर दंत महाविद्यालयासोबतच पूर्व आणि पश्चिम उपनगरात प्रत्येकी ८ असे एकूण १६ उपनगरीय रुग्णालये चालविली जातात. उपनगरीय रुग्णालयांमध्ये ४ मोठी, ४ मध्यम आणि ८ लहान रुग्णालयांच्या माध्यमातून ३२४५ खाटा उलब्ध आहेत.