नाटुकली व कथाकथनाचा ‘विशेष’ आविष्कार...!
By admin | Published: January 12, 2017 06:33 AM2017-01-12T06:33:06+5:302017-01-12T06:33:06+5:30
कुणी हातात केरसुणी घेतली आहे, कुणी स्वच्छतेबाबत संदेश देत आहे, कुणी इतस्तत: विखुरलेला कचरा
राज चिंचणकर / मुंबई
कुणी हातात केरसुणी घेतली आहे, कुणी स्वच्छतेबाबत संदेश देत आहे, कुणी इतस्तत: विखुरलेला कचरा टोपलीत भरत आहे, तर कुणी आरोग्यविषयक माहिती देत आहे... असे नाट्यचित्र रंगले, ते शालेय विद्यार्थ्यांच्या एका नाटुकली स्पर्धेत! परंतु अशा प्रकारे समाजप्रबोधन करणारी ही मुले ‘सर्वसाधारण’ नव्हती, तर ती होती कर्णबधिर आणि गतिमंद, अर्थात ‘विशेष’ अशी मुले! माहीम सार्वजनिक वाचनालयाने आयोजित केलेल्या नाटुकली व वीर कथाकथन स्पर्धेत या मुलांनी त्यांच्या अंगभूत कलागुणांचे दर्शन घडवत, ‘विशेष’ आविष्कार सादर केले आणि प्रेक्षकांना थक्क करून सोडले.
वाचनसंस्कृतीसह सांस्कृतिक व सामाजिक बांधिलकी जपत कार्यरत असलेल्या माहीम सार्वजनिक वाचनालयाने, सामाजिक ध्यास घेत, कर्णबधिर व गतिमंद मुलांसाठी नाटुकली व वीर कथाकथन स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत तब्बल ४० मुलांनी सहभाग नोंदवला होता. १ली ते ३री, ४थी ते ६वी आणि ७वी ते ९वी असे तीन गट असलेल्या या स्पर्धेत सहभागी झालेल्या मुलांचा उत्साह ओसंडून वाहात होता. आव्हान पालक संघ, निर्धार प्रतिष्ठान, उत्कर्ष संघ, द बॉम्बे इन्स्टिटयूट, सेंट्रल स्कूल, विकास विद्यालय, विजय शिक्षण संस्था तथा साधना विद्यालय आदी शाळांच्या विद्यार्थ्यांनी ही स्पर्धा गाजवली. नाटुकली स्पर्धेसाठी ‘स्वच्छ परिसर, सुंदर परिसर’ हा विषय देण्यात आला होता आणि त्यावर या मुलांनी ई-कचरा, रिसायकलिंग, स्वच्छ भारत, तसेच चिकनगुनिया, मलेरिया, डेंग्यू अशा विविध विषयांवर स्वकल्पनेतून निर्माण केलेल्या नाटुकल्या सादर केल्या, तर वीर कथाकथन स्पर्धेत मुलांनी वक्तृत्व गुणांचे आशादायी आविष्कार सादर करत, ‘हम भी कुछ कम नहीं’ याची प्रचिती दिली.
नाटुकली स्पर्धेत कर्णबधिर मुलांच्या गटात सेंट्रल स्कूलच्या समीक्षा, सिद्धी, भावेश व उत्तम यांच्या चमूला प्रथम पारितोषिक प्राप्त झाले, तर द बॉम्बे इन्स्टिट्यूटच्या तुबा, आफ्रिन, ज्योती व सबा या चमूला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. या स्पर्धेच्या गतिमंद मुलांच्या गटात आव्हान पालक संघाचा संजीवनी, पूनम, दीप्ती व मयूर यांचा चमू प्रथम, तर निर्धार प्रतिष्ठानचा गीता, भारती, रूपेश, शिरीष व समीरा यांचा चमू क्रमांकात उत्तेजनार्थ ठरला. वीर कथाकथन स्पर्धेत कर्णबधिर मुलांच्या गटात मेधा तांबे (विकास विद्यालय), भाग्यश्री दैत (साधना विद्यालय) व गौरी घाडगे (साधना विद्यालय) ही मुले अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिकांची मानकरी ठरली, तर या स्पर्धेच्या गतिमंद मुलांच्या गटात मनीषा गायकवाड (आव्हान पालक संघ) हिला प्रथम आणि गीता कळंबी (निर्धार प्रतिष्ठान) हिला द्वितीय पारितोषिक मिळाले.