Join us

शिक्षकांच्या राज्यस्तरीय शैक्षणिक कृतिसत्रास 'विशेष रजा' मंजूर, शिक्षण विभागाने काढले आदेश  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2018 1:18 PM

शनिवारपासून (20 जानेवारी) सुरू होणाऱ्या राज्यातील शिक्षकांच्या शैक्षणिक कृतिसत्रास उपस्थित राहण्यासाठी शिक्षण विभागाने शिक्षकांना विशेष कर्तव्य रजा मंजूर केली असल्याचे शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी सांगितले आहे.

मुंबई - शनिवारपासून (20 जानेवारी) सुरू होणाऱ्या राज्यातील शिक्षकांच्या शैक्षणिक कृतिसत्रास उपस्थित राहण्यासाठी शिक्षण विभागाने शिक्षकांना विशेष कर्तव्य रजा मंजूर केली असल्याचे शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी सांगितले आहे. महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघाचे 37वे राज्यस्तरीय वार्षिक शैक्षणिक कृतिसत्र शनिवार २० ते रविवार २१ जानेवारी रोजी नागपुरात होत असून हे कृतिसत्र शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी आयोजित केले असल्याने या कृतिसत्रास उपस्थित राहणाऱ्या शिक्षकांना कर्तव्य रजा देण्यात यावी, अशी मागणी शिक्षक संघाने  व शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अनिल बोरनारे यांनी  शालेय शिक्षण विभागाकडे ६ नोव्हेंबर रोजी केली होती.

पण याबाबत शालेय शिक्षण विभागाकडून कार्यवाही होत नव्हती. अखेर गुरुवारी याबाबत शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अनिल बोरनारे यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली त्यानंतर मंत्रालयात हालचाली सुरू झाल्या व शालेय शिक्षण विभागाच्या अवर सचिवांनी राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच शिक्षणाधिकारी व मुंबईतील शिक्षण निरीक्षकांना आदेश देत या कृतिसत्रास उपस्थित राहणाऱ्या शिक्षकांना विशेष रजा देण्यात आल्याचे आदेश दिले.

त्यामुळे या शैक्षणिक कृतीसत्राला उपस्थित राहणाऱ्या शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले. अध्ययन व अध्यापन आनंददायी कसे करता येईल, बदललेल्या अभ्यासक्रमात उत्तरपत्रिकांचे नव्याने आलेल्या कृतिपत्रिकेचे समीक्षण कसे करावे यासह अन्य शैक्षणिक विषयांवर या कृतीसत्रात शोध निबंध सादर केले जाणार असून शासनाला काही शिफारशी केल्या जाणार आहेत.

नागपूरला होणाऱ्या या  कृतिसत्राला विशेष रजा मंजूर केल्याबद्दल शिक्षणमंत्री विनोद तावडे व शिक्षण विभागाचे महाराष्ट्र मराठी अध्यापक संघाने आभार मानले असल्याचेही अनिल बोरनारे यांनी सांगितले.

टॅग्स :शिक्षकशाळा