मुंबई : शतक महोत्सवी वर्षानिमित्त सारस्वत बँकेतर्फे भारतीय सैनिकांसाठी विशेष कर्जयोजना राबवण्यात येणार आहे. सैनिकांसोबतच दिव्यांगांसाठीही आर्थिक योजनांची घोषणा १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता षण्मुखानंद सभागृहातील कार्यक्रमात केली जाईल, असे बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उद्योग मंत्री सुरेश प्रभू, मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंग, रिझर्व्ह बँकेचे कार्यकारी संचालक सुदर्शन सेन आणि ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांची सोहळ्यास प्रमुख उपस्थिती असेल. या कार्यक्रमात भूदलासह नौदल, हवाईदल, तटरक्षक दल आणि निमलष्करी दलातील सैनिकांसाठी विशेष कर्जयोजना जाहीर केली जाईल. सोबतच दिव्यांग व्यक्तींसाठी आर्थिक योजना जाहीर होतील. येत्या वर्षभरात टोल नाक्यावरील ‘नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन’च्या स्वयंचलित वजावटीत सारस्वत बँक ‘फास्ट टॅग’ या उत्पादनाद्वारे सामील होईल, अशी माहिती ठाकूर यांनी दिली.१०० व्या वर्षात पदार्पण करणा-या सारस्वत बँकेच्या २८३ शाखांचे जाळे महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश आणि दिल्लीपर्यंत पसरले आहे. ३१ मार्च २०१७ अखेरीस बँकेचा एकूण व्यवसाय ५५ हजार २७३ कोटी रुपये इतका होता. राज्य शासनाने १० जिल्ह्यांतील रेशन दुकानांमध्ये व्यावसायिक प्रतिनिधीत्व देत आधार कार्डवर आधारित पेमेंट सेवा पुरवण्यासाठी बँकेची नियुक्ती झाल्याचेही ठाकूर यांनी यावेळी सांगितले. इतर सहकारी बँकांना आणि क्रेडिट सोसायटींना बँकिंगविषयी प्रशिक्षण देण्यासाठी सर्व सोयींनीयुक्त इमारत बांधण्याचा बँकेचा आहे. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष शशीकांत साखळकर, संचालक एस. एन. सवईकर, संचालक किशोर रांगणेकर, संचालक के. डी. उमरूतकर, संचालक एस. एस. शिरोडकर, संचालक मंडळाचे सल्लागार एस. के. बॅनर्जी, व्यवस्थापकीय संचालक स्मिता सांधणे, सहव्यवस्थापकीय संचालक एल. आर. सामंत उपस्थित होते.
सारस्वत बँकेची सैनिकांसाठी विशेष कर्जयोजना, शतक महोत्सवी वर्षाचे निमित्त; दिव्यांगांसाठीही योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 3:56 AM