३१ डिसेंबरच्या मध्यरात्री मध्य, पश्चिम रेल्वेवर विशेष लोकल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 06:39 AM2018-12-27T06:39:50+5:302018-12-27T06:40:02+5:30
नववर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना मध्यरात्रीपर्यंत प्रवास करता यावा यासाठी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर विशेष लोकल चालविल्या जाणार आहेत.
मुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना मध्यरात्रीपर्यंत प्रवास करता यावा यासाठी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर विशेष लोकल चालविल्या जाणार आहेत. प्रवाशांच्या सुविधेसाठी पश्चिम रेल्वेमार्गावर ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री चर्चगेट ते विरारपर्यंत चार आणि विरार ते चर्चगेटपर्यंत चार विशेष लोकल चालविण्यात येतील. १२ डब्यांच्या या लोकल सर्व स्थानकांवर थांबतील. तर, मध्य रेल्वेवर दोन तसेच हार्बर मार्गावर दोन विशेष लोकल चालविण्यात येतील.
डाऊन मार्गावरील विशेष लोकलमध्ये पहिली लोकल ३१ डिसेंबरच्या रात्री चर्चगेट स्थानकातून रात्री १ वाजून १५ मिनिटांची असून, विरार स्थानकात रात्री २ वाजून ५५ मिनिटांनी पोहोचेल. दुसरी लोकल चर्चगेट स्थानकातून रात्री २ वाजता सुटेल आणि विरार स्थानकात रात्री ३ वाजून ४० मिनिटांनी पोहोचेल. तिसरी लोकल चर्चगेट स्थानकातून रात्री २ वाजून ३० मिनिटांची असून विरार स्थानकात पहाटे ४ वाजून १० मिनिटांनी पोहोचेल. तर, चौथी लोकल चर्चगेट स्थानकातून रात्री ३ वाजून २५ मिनिटांची असून विरार स्थानकात पहाटे ५ वाजून ०५ मिनिटांनी पोहोचेल.
अप मार्गावरील विशेष लोकलमध्ये पहिली लोकल विरार स्थानकातून रात्री १२ वाजून १५ मिनिटांची असून चर्चगेट स्थानकात रात्री १ वाजून ४७ मिनिटांनी पोहोचेल. दुसरी लोकल विरार स्थानकातून रात्री १२ वाजून ४५ मिनिटांची असून चर्चगेट स्थानकात रात्री २ वाजून १७ मिनिटांनी पोहोचेल. तिसरी लोकल विरार स्थानकातून रात्री १ वाजून ४० मिनिटांची असून चर्चगेट स्थानकात रात्री ३ वाजून १२ मिनिटांनी पोहोचेल. तर, चौथी लोकल विरार स्थानकातून रात्री ३ वाजून ०५ मिनिटांची असून चर्चगेट स्थानकात पहाटे ४ वाजून ३७ मिनिटांनी पोहोचेल.
मध्य, हार्बरसाठी अशा धावतील विशेष लोकल
मध्य, हार्बर मार्गावर ३१ डिसेंबरच्या रात्री चार विशेष लोकल धावतील. पहिली विशेष लोकल सीएसएमटीहून रात्री १ वाजून ३० मिनिटांनी सुटून कल्याण स्थानकात रात्री ३ वाजता पोहोचेल. दुसरी लोकल कल्याण स्थानकातून रात्री १ वाजून ३० मिनिटांनी सुटून सीएसएमटी येथे रात्री ३ वाजता पोहोचेल. हार्बर मार्गावरील पहिली विशेष लोकल सीएसएमटीहून१ वाजून ३० मिनिटांनी सुटून पनवेलला २.३० वाजता पोहोचेल तर, दुसरी लोकल पनवेल स्थानकातून रात्री १ वाजून ३० मिनिटांनी सुटून सीएसएमटी येथे २ वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल.