सीएसएमटी-पनवेल मार्गावर आजपासून रात्रीच्या विशेष लोकल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 05:44 AM2018-09-20T05:44:04+5:302018-09-20T06:51:39+5:30
हार्बर प्रवाशांच्या टीकेनंतर मध्य रेल्वेला उपरती; भाविकांना दिलासा
मुंबई : गणेशोत्सवात होणाऱ्या गर्दी नियोजनासाठी मध्य रेल्वेने हार्बर मार्गावरदेखील बुधवारपासून विसर्जनापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल मार्गावर चार विशेष लोकल फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
अनंत चतुर्दशीच्या (रविवार-सोमवार) रात्री सीएसएमटी येथून विशेष पहिली लोकल मध्यरात्री १.३० वाजता सुटणार असून, पनवेलला मध्यरात्री २ वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल. शेवटची विशेष लोकल पनवेलवरून १.४० वाजता सीएसएमटीसाठी रवाना होईल. विशेष लोकल सर्व स्थानकांवर थांबतील.
मंगळवारी मध्य रेल्वेने मध्य मार्गावर विसर्जन विशेष लोकल चालविण्याची घोषणा केली होती. हार्बर मार्गावर विशेष लोकल नसल्यामुळे हार्बर प्रवाशांनी प्रशासनाच्या कारभारावर टीकेची झोड उठविली. अनंत चतुर्दशीच्या रात्री पश्चिम रेल्वेने एकूण ८ लोकल फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतल्यानंतर, याच धर्तीवर मध्य रेल्वेनेदेखील मध्य आणि हार्बर मार्गावर एकूण ८ फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला. मध्य रेल्वेने हार्बर मार्गावर विशेष लोकल चालविण्याच्या निर्णय घेतल्यानंतर, हार्बर प्रवाशांनी समाधान व्यक्त केले असून, प्रवाशांच्या टीकेनंतर मध्य रेल्वेला जाग आल्याची प्रतिक्रिया प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.
हार्बर रेल्वे
सीएसएमटी ते पनवेल : १.३० आणि २.४५
पनवेल ते सीएसएमटी : १.०० आणि १.४०
अनंत चतुर्दशीच्या रात्री मध्य रेल्वेच्या विशेष फेऱ्या
मध्य रेल्वे
सीएसएमटी ते कल्याण : १.३० आणि २.३०
कल्याण ते सीएसएमटी : १.००
ठाणे ते सीएसएमटी : २.००