रेल्वे कर्मचाऱ्यांची विशेष लोकल रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 04:07 PM2020-05-26T16:07:41+5:302020-05-26T17:32:48+5:30
फिजिकल डिस्टिन्सिंगचे तीनतेरा वाजल्यानंतर निर्णय
मुंबई : मध्य रेल्वे प्रशासनाने फक्त रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरु केली होती. मात्र कर्मचाऱ्याच्या विशेष लोकलमधील गर्दी आणि दाटीवाटीच्या प्रवासाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यामध्ये फिजिकल डिस्टिन्सिंग नियमाचे उल्लंघन झाले. या व्हायरल व्हिडिओचा धसका घेत रेल्वे कर्मचाऱ्यांची विशेष लोकल रद्द केली आहे.
मध्य रेल्वेच्या माटुंगा आणि परळ या वर्कशॉपमध्ये ३३ टक्क्यापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामावर बोलवण्यात आले होते. त्यासाठी २० मे रोजीपासून कर्मचाऱ्यांसाठी विशेष लोकल सोडण्यात आली. मात्र या लोकलमध्ये फिजिकल डिस्टन्सचा फज्जा उडाला. २५ मे रोजी मेल, एक्सप्रेसचे सामान्य श्रेणीचे डबे रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी सोडण्यात आले. परंतु, यामध्येही कर्मचाऱ्यांची गर्दी होऊ लागली. त्यानंतर आता शटल सेवा सुरु करण्यात येणार आहे.
-------------------------
मर्यादित कर्मचाऱ्यांना बोलावणार वर्कशॉपमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या ७ टक्के म्हणजेच ५०० कर्मचारी कामावर उपस्थित राहणार आहेत.
------------------------
मध्य रेल्वे प्रशासनाने रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी सुरु केलेली लोकल सेवा मंगळवारी बंद होती. रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आधीपासून सुरु असलेली शटल सेवा सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली.
------------------------
रेल्वे मंत्रालयाने १ जून पासून नियोजित वेळापत्रकानुसार दररोज १०० ट्रेनच्या २०० फेऱ्या सुरु करण्याची घोषणा रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी केली होती. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या वर्कशाॅप मधील कर्मचारी, देखभाल दुरूस्तीचे कर्मचारी, रेल्वे स्टेशनवर काम करणारे कर्मचाऱ्यांना कामावर बोलवण्यात आले आहे. मात्र फिजिकल डिस्टिन्सिंग नियमाचे पालन होत नसल्याने कमी कर्मचारी आणि शटल सेवा सुरु केली आहे.
-----------------------