Join us

माध्यम क्षेत्रात प्रशिक्षित माध्यम प्रतिनिधींची विशेष गरज - राज्यपाल

By admin | Published: March 22, 2017 1:43 AM

गेल्या २० वर्षांच्या काळात माध्यम क्षेत्रात क्रांतिकारी बदल झाले असून, आज विविध विषयांना समर्पित किमान ५०० टीव्ही वाहिन्या निर्माण झाल्या आहेत

मुंबई : गेल्या २० वर्षांच्या काळात माध्यम क्षेत्रात क्रांतिकारी बदल झाले असून, आज विविध विषयांना समर्पित किमान ५०० टीव्ही वाहिन्या निर्माण झाल्या आहेत; यात अनेक वृत्तवाहिन्यांचाही समावेश आहे. याच काळात इंटरनेट तंत्रज्ञान आले, मोबाइल फोन, स्मार्ट फोन, सोशल मीडिया, व्हॉट्सअ‍ॅपसारख्या प्रणाली आल्या. त्यामुळे प्रसार माध्यम व वृत्त प्रसारण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल झाले. या पार्श्वभूमीवर माध्यम क्षेत्रात प्रशिक्षित माध्यमप्रतिनिधींची विशेष गरज निर्माण झाली आहे, असे राज्यपाल विद्यासागर राव यांनी सांगितले.प्रसारण पत्रकारितेतील मूलभूत तत्त्वे व तंत्र शास्त्रीय पद्धतीने समजावून देणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. मुंबई दूरदर्शनचे सेवानिवृत्त अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा यांनी लिहिलेले ‘एबीसी आॅफ ब्रॉडकास्ट न्यूज’ हे पुस्तक इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमात काम करणाऱ्या पत्रकारांना तसेच देशभरातील विद्यापीठे व महाविद्यालये यांमधील जनसंवाद शाखेच्या विद्यार्थ्यांना निश्चितपणे उपयुक्त ठरेल, असा विश्वास राज्यपाल विद्यासागर राव यांनी येथे व्यक्त केला. प्रसार माध्यमांनी समाजातील उपेक्षितांच्या प्रश्नांना वाचा फोडावी, अशीही अपेक्षा राज्यपालांनी या वेळी व्यक्त केली. या वेळी दूरदर्शनद्वारे निर्मित सपना साखरे या सोलापूर जिल्ह्यातील लहान मुलीच्या जीवनावर आधारित ‘सपना’ या लघुपटाचे राज्यपालांच्या उपस्थितीत प्रदर्शन करण्यात आले. त्यातून ‘बेटी बचाओ, बेटी बढाओ’ हा संदेश देण्यात आला आहे. या वेळी राज्यपालांसह सर्व उपस्थितांनी सपनाला कौतुकाची थाप दिली. (प्रतिनिधी)