महामार्गावर खास पेट्रोलिंग

By admin | Published: September 6, 2016 10:58 PM2016-09-06T22:58:39+5:302016-09-06T23:46:31+5:30

अनघा बारटक्के : मध्यवर्ती बसस्थानकाचे भूमिपूजन लवकरच

Special petrol on the highway | महामार्गावर खास पेट्रोलिंग

महामार्गावर खास पेट्रोलिंग

Next

कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. मुंबईहून २०४६ गाड्या कोकणात आल्या आहेत. पैकी रत्नागिरी जिल्ह्यात १४६८ गाड्यांतून मुंबईकर आले आहेत. मंडणगड तालुक्यामध्ये ७४, दापोलीत १७७, खेड १००, चिपळूण ३३६, गुहागर २७६, देवरूख १००, रत्नागिरी १६२, लांजा ९०, तर राजापूरमध्ये एस. टी.च्या १३३ गाड्या आल्या आहेत. आलेल्या सर्व गाड्या त्या त्या आगारात थांबवून ठेवण्यात आल्या आहेत. नाशिक, औरंगाबाद रिजनच्या ६८१ गाड्या चालकासह गणेशोत्सवासाठी घेण्यात आल्या असून, या गाड्या परतीच्या प्रवासासाठी पाठवण्यात येणार आहेत. दहा तारखेपासून परतीच्या गाड्या निघणार आहेत. आतापर्यंत ९८० गाड्यांचे आरक्षण झाले आहे. सर्वाधिक गाड्या ११ तारखेला सुटणार आहेत. अजून गाड्यांचे बुकिंग वाढण्याची शक्यता असल्याची माहिती राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली.

प्रश्न : गणेशोत्सवाकरिता एस. टी.ने खास नियोजन केले आहे का?
उत्तर : गणेशोत्सवासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने गावी येतात. मुंबईकरांची येण्या-जाण्याच्या प्रवासात कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी चोख नियोजन करण्यात आले आहे. मुंबईकरांचा येण्याचा प्रवास निर्विघ्न पार पडला आहे. मुंबईकरांना सुखरूप मुंबईला सोडण्यासाठीचेही नियोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवात खास जादा गाड्यांसमवेत महामार्गावर गस्तीपथके तैनात करण्यात आली आहेत. चिपळूण व कशेडी येथे चेकपोस्ट उभारण्यात आले आहे. संगमेश्वर येथे दुरूस्ती केंद्र, तर कशेडी ते संगमेश्वर व संगमेश्वर ते खारेपाटण मार्गावर गस्तीपथकांतर्फे गस्त सुरू आहे. महामार्गावर प्रशिक्षण बस तसेच खास पथकाव्दारे ‘स्पेशल पेट्रोलिंग’ करण्यात येत आहे. एस. टी.तील सर्व कर्मचारी, अधिकारी, चालक, वाहक यांच्या सहकार्याने नियोजनाची अंमलबजावणी योग्य पध्दतीने सुरू आहे.
प्रश्न : परतीच्या प्रवासासाठी किती आरक्षण झाले आहे ?
उत्तर : राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आॅनलाईन तसेच मोबाईल अ‍ॅपव्दारे सुरू केलेल्या आरक्षण सुविधेला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. आतापर्यंत रत्नागिरी विभागातील नऊ आगारांतून एकूण ९८० गाड्यांचे आरक्षण पूर्ण करण्यात आले असून, २२८ ग्रुप बुकिंगच्या गाड्या आहेत. दहा तारखेला गौरी-गणपतींचे विसर्जन होणार आहे. त्यानंतर परतीच्या प्रवासाला गर्दी होणार आहे. सर्वाधिक गाड्या ११ रोजी सुटणार आहेत. अद्याप बुकिंग सुरू असून, गाड्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
प्रश्न : परतीच्या प्रवासासाठी जादा गाड्या मागविण्यात आल्या आहेत का ?
उत्तर : मुंबईहून प्रवाशांना घेऊन १४६८ गाड्या रत्नागिरीत आल्या आहेत. आलेल्या गाड्या त्या त्या आगारात थांबवून ठेवण्यात आल्या आहेत. औरंगाबाद, नाशिक रिजनमधील एकूण ६८१ गाड्या असून, त्या गाड्यांचे चालक परत गेले आहेत. मुंबईच्या परतीसाठी या गाड्या वापरण्यात येणार आहेत. त्यावेळी पुन्हा चालकांना बोलावून घेण्यात येणार आहे.
प्रश्न : सावित्री नदी पूल दुर्घटनेतील प्रवाशांना मदत केव्हा वितरीत केली जाणार आहे?
उत्तर : सावित्री नदी पूल दुर्घटनेत राजापूर - बोरिवली व जयगड - मुंबई गाडीतील प्रवासी व चालक वाहक मिळून एकूण ३१ जण मृत झाले. एस. टी.तील मृतांच्या नातेवाईकांना दहा लाख देण्याचा शासनाचा अध्यादेश जारी झाला आहे. मात्र, मुंबई सेंट्रलवरून याबाबत कोणतीही सूचना काढण्यात आलेली नाही. सूचना प्राप्त होताच तातडीने कार्यवाही करण्यात येणार आहे.
प्रश्न : रत्नागिरी विभागात रिक्त पदे किती आहेत ?
उत्तर : रत्नागिरी विभागात कर्मचारी, अधिकारी मिळून हजार पदे रिक्त आहेत. पैकी वाहकांची ४००, तर चालकांची २०० पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे चालक - वाहकांवर डबल ड्युटीचा ताण येतो. शिवाय कर्मचारी व अधिकाऱ्यांनाही अतिरिक्त कामाचा ताण सोसावा लागतो. परंतु महामंडळाच्या भरतीनंतरच रिक्त पदे भरली जाणार आहेत.
प्रश्न : यशवंत रामागडेवर कारवाई केली का?
उत्तर : रोकड विभागात दि. २५ डिसेंबर २०१५, दि. १ जानेवारी २०१६ व दि. ६ एप्रिल २०१६ रोजी आग लागली होती. त्यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्यानंतर दि. ८ आॅगस्ट रोजी सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक कार्यालयास पुन्हा आग लावण्याचा प्रयत्न करणारा यशवंत रामागडे सध्या कोठडीत आहे. न्यायालयीन कारवाई पूर्ण झाल्यानंतरच त्यावर महामंडळातर्फे कारवाई केली जाणार आहे.
प्रश्न : रहाटाघर बसस्थानकात सुविधांची उपलब्धता केव्हा होणार?
उत्तर : रहाटाघर बसस्थानकातून सध्या कोल्हापूर मार्गावरील गाड्यांबरोबर कर्नाटक राज्यातील गाड्या सोडण्यात येत आहेत. या बसस्थानकात पंखे, विजेचे दिवे, पिण्याचे पाणी, नळ तसेच स्वच्छतेबाबत गैरसोयी आहेत. या बसस्थानकात स्वच्छता राखण्याबरोबर सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या बसस्थानकाचा वापर अधिकाधिक वाढविण्यासाठी नियोजन सुरू आहे.
- मेहरून नाकाडे

Web Title: Special petrol on the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.