नवाब मलिकांना न्यायालयाकडून खुर्ची; कोठडीत ४ एप्रिलपर्यंत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 07:15 AM2022-03-22T07:15:39+5:302022-03-22T07:18:19+5:30
मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टाने मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत ४ एप्रिलपर्यंत वाढ केली. तर न्यायालयाच्या आदेशानुसार मलिक यांना कोठडीत बिछाना, खुर्ची उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मुंबई : कुख्यात दाऊद इब्राहिम, त्याचे कुटुंबीय आणि टोळीतील सदस्यांसंबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले मंत्री नवाब मलिक यांचा कारागृहातील मुक्काम आणखी वाढला आहे. मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टाने मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत ४ एप्रिलपर्यंत वाढ केली. तर न्यायालयाच्या आदेशानुसार मलिक यांना कोठडीत बिछाना, खुर्ची उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
ईडीने २३ फेब्रुवारीला मलिक यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे. यामध्ये त्यांना २१ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावत त्यांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली. त्यांची कोठडी संपत असल्याने त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा न्यायालयाने त्यांच्या कोठडीत ४ एप्रिलपर्यंत वाढ केली. यावेळी मलिक यांना पाठदुखीचा त्रास असल्याने त्यांना खुर्ची तसेच बिछाना हवा आहे, अशी विनंती त्यांच्या वकिलांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली. तसेच, उच्च रक्तदाब व मधुमेह असल्याने कमी मीठ असलेले घरचे जेवण मिळावे, अशा विनंतीचाही अर्ज केला होता. त्यावर मलिक यांचा वैद्यकीय अहवाल पाहून निर्णय देऊ, असे न्यायाधीशांनी स्पष्ट केले.