मुंबई - अनेक मुद्द्यांवरून राज्याच्या विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे अनेक मुद्द्यांवरून वादळी ठरत आहे. त्याचदरम्यान, आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सव्वाशे तासांचं रेकॉर्डिंग असलेली व्हिडीओ क्लिप सभागृहात सादर करून त्यातील काही संवादांचे वाचन करून खळबळ उडवून दिली आहे. या व्हिडीओ क्लिपमधील विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या संवादावरून फडणवीसांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्थ्य नसल्याचे प्रवीण चव्हाण यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात एका खासगी वृत्तवाहिनीश बोलताना विशेष सरकारी प्रवीण चव्हाण म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्थ्य नाही आहे. मी फक्त ऑफिसमध्ये बसलेला दिसतोय. ऑफिसमधील कुठल्यातरी व्यक्तीला मॅनेज करून व्हिडीओ शुटिंग घेतलं असावं. हे व्हिडीओ मॅनिप्युलेट केलेले आहेत. दरम्यान, मी फाईल पुरवण्याच्या प्रश्नच येत नाही, माझ्याकडे फाईल असण्याचा प्रश्न नाही, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, अनिल गोटे यांच्यासोबतच्या व्हिडीओबाबत प्रवीण चव्हाण म्हणाले की, अनिल गोटे माझ्या कार्यालयात आले होते. ते पुण्यातील एका केस संदर्भात माझ्याकडे आले होते. त्यावेळी अनिल गोटे यांनी काही कागदपत्रे दाखवली. मात्र मी माझ्याकडे वेळ नसल्याचे सांगितले. तसेच अनिल देशमुखांबाबतही मी कुठलेही विधान केलेले नाही.
विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी भाजपा नेते गिरीश महाजन यांना खोट्या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला, असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केला होता. त्यावर प्रवीण चव्हाण म्हणाले की, त्या प्रकरणात तसं काहीही झालेलं नाही. तसेच महाजनांना अडकवण्यासाठीचा ड्राफ्ट तयार केल्याचा आरोपही चव्हाण यांनी फेटाळून लावला. तसेच अशा प्रकरणांचा तपास हा पोलीस करत असतात. या प्रकरणात मी विशेष सरकारी वकील आहे. त्यामुळे मला या प्रकरणाची माहिती असणं स्वाभाविक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.यावेळी संभाषणात उल्लेख केलेले मोठे साहेब कोण असे विचारले असता विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण म्हणाले की, मोठे साहेब वगैरे कुणी नाही आहेत. आपण सामान्यपणे बोलताना उल्लेख करतो, तसा उल्लेख मी केला. त्याबरोबरच अनिल देशमुख यांच्यासोबत कुठलीही भेट झालेली नाही, असेही त्यांनी सांगितले.