Join us

शहर को हुआ क्या? कही नशा तो.. अमली पदार्थांचे मुक्काम पाेस्ट मुंबई अन् आसपासची शहरं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 7:05 AM

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर परिसरातील घटनांचा, कारवायांचा घेतलेला हा आढावा

मुंबई : राकट, कणखर, प्रसंगी हिमालयाच्या मदतीला धावणारा सह्याद्री अशी महाराष्ट्राची ओळख आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ करणाऱ्या बातम्यांनी वर्तमानपत्रांची बहुतांश जागा व्यापली आहे. ललित पाटील या ड्रग्जमाफियाच्या अटकेनंतर अमली पदार्थांचे हे ‘डार्कवेब’ महाराष्ट्रात किती सुदूरपर्यंत पोहोचले आहे, याचे मन सुन्न करून सोडणारे चित्र दररोज पुढे येत आहे. राज्यातील अनेक छोट्यामोठ्या शहरांपर्यंत या प्रकरणाचे धागेदोरे पोहोचले आहेत. अनेक तरुण कळत-नकळत नशेच्या या बाजारात ओढले गेले आहेत. सर्व यंत्रणा नशेच्या या पदार्थांची साखळी तोडण्यासाठी जिवाचे रान करीत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर परिसरातील घटनांचा, कारवायांचा घेतलेला हा आढावा...

ठाण्यात अवघ्या दहा महिन्यांत पावणेचार कोटींचे ड्रग्ज जप्त, ७७२ अटकेत

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : अमली पदार्थविरोधी पथकासह ठाण्यातील स्थानिक पोलिसांच्या विविध पथकांनी गेल्या दहा महिन्यांमध्ये एक कोटी १६ लाख ४६ हजारांच्या गांजासह कोकेन, मॅफेड्रॉन असा तीन कोटी ७७ लाख ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यातील २९ गुन्ह्यांमध्ये एक किलो ५८५ ग्रॅम एमडी पावडरची तस्करी करणाऱ्या ४८ आरोपींकडून ६४ लाख ९२ हजार ८७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आतापर्यंत ६६३ गुन्ह्यांमध्ये ७७२ आरोपींना अटक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाणे शहर आयुक्तालयात ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाच परिमंडळांमधील ३५ पोलिस ठाण्यांची विविध पथके तसेच अमली पदार्थ विरोधी पथकासह गुन्हे अन्वेषण विभागांच्या पथकांनी अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. पंजाब उगले यांच्या मार्गदर्शनाखाली १ जानेवारी ते १५ ऑक्टाेबर २०२३ या दरम्यान कारवाई केली. यामध्ये ३९ गुन्ह्यांमध्ये एक कोटी १६ लाख ४६ हजार ५१८ रुपयांचा ७३९ किलो ८२७ ग्रॅम गांजा जप्त करुन ५३ जणांना अटक केली.

मॅफेड्रॉनच्या २९ गुन्ह्यांमध्ये ६४ लाख ९२ हजार ८७० रुपयांचा एक किलो ५८५ ग्रॅम ८८ मी. ग्रॅम मॅफेड्रॉन जप्त झाले. यात ४८ आरोपींना अटक झाली. त्याचबरोबर एक लाख २० हजारांचे २२ ग्रॅमचे एलएसडी पेपरचे १५ नग तसेच तीन हजार ७१९ कफ सिरप बॉटल जप्त केल्या आहेत. यामध्ये ३७ लाख ८८ हजारांचा ऐवज जप्त करून २० आरोपींना अटक केली. याशिवाय, एका तस्कराकडून ६५ हजारांचे १३ ग्रॅमचे हेराॅईन जप्त केले. यात एकाला अटक केली आहे. तंबाखू, गांजाचे सेवन करणाऱ्या ६३४ आरोपींवर कारवाई केली.चरसच्या सहा गुन्ह्यांमध्ये १२ तस्करांना अटक केली. त्यांच्याकडून ७२ लाख ७४ हजारांचे आठ किलो १८३ ग्रॅमचे चरस जप्त केले. तर दाेघांकडून ५८ लाख ८० हजारांचे १४७ ग्रॅम कोकेन जप्त केले.

कारवाई अशी

  • ठाणे आयुक्तालयात १ ते १५ ऑक्टाेबर २०२३ या दरम्यान गांजा, चरस, कोकेन आणि एमडीचे ६३ गुन्हे दाखल झाले.  
  • ९९,४६,७८४ 
  • रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला. यात ७६ आरोपींना अटक झाली. अमली पदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय शिंदे यांच्या पथकाने १९ गुन्ह्यांमध्ये ५२ आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून एक कोटी १९ लाख १८ हजारांचा अमली पदार्थ जप्त केला आहे.

-----------------------------------------

तब्बल पाच हजार कोटी...! गेल्या पाच वर्षांत मुंबईत जप्त झाला एमडी साठा...

मनीषा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सर्वात घातक समजल्या जाणाऱ्या एमडी या ड्रग्जचा ५ हजार २९४ कोटी रुपये किमतीचा जवळपास २८०० किलोंचा साठा गेल्या पाच वर्षांत जप्त करण्यात अमली पदार्थ विरोधी विभागाला (एएनसी) यश आले आहे. तर, त्यापाठोपाठ ८ हजार २९८ किलो गांजाही जप्त करत तब्बल अडीच हजार लोकांना कोठडीची हवा खाण्यासाठी पाठविण्यात आले आहे. अमली पदार्थ विरोधी विभागाचे पोलिस उपायुक्त प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत ड्रग्ज विरोधात धडक कारवाई सुरू आहे. २०१८ ते ऑक्टोबर, २०२३ दरम्यान एएनसीने २ हजार ७९४ किलो एमडी साठा जप्त केला. याप्रकरणी ८५० गुन्हे नोंदवत १ हजार १६८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. गेल्या वर्षी एमडीचा २,४५० किलोचा साठा पकडण्यास पथकाला यश आले होते. मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईत गेल्या ९ महिन्यात एकूण ड्रग्ज संबंधित ८ हजार ५६८ गुन्हे नोंदवत ८ हजार ७६१ जणांना अटक केली आहे. या कारवाईत ६२ कोटी ५७ लाख किमतीचे ड्रग्ज जप्त केले आहे.

नशेचे वाढते व्यसन आणि सुन्न करणारी आकडेवारी

प्रकार    गुन्हे    आरोपी    वजन     किंमतहेरॉईन    २९    ३३    १.८    ३,८८,६३,५०० चरस    २५    ४२    २१    ४,७०,५७,१२० गांजा    ७३२    ७८९    ५७९.०    २,०८,१२,०८९ कोकेन    ०७    १२    ०.२    ५१,८६,००० एमडी    ३२४    ४६३    २५.७    ४०,५२,८६,२५५ अन्य ड्रग्ज    २२    ३१    १६.३    १०,००,४९,१९४

---------------------------

तीन वर्षांत ४६१ किलो अमली पदार्थ जप्त, नवी मुंबईत २८ नायजेरियनवर कारवाई

सूर्यकांत वाघमारे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईला ड्रग्जमाफियांनी विळखा घातला आहे. या विळख्यातून शहराला सोडविण्यासाठी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यामध्ये अवघ्या नऊ महिन्यांत १६ कोटी ३४ लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. त्यात गांजासह प्रयोगशाळेत तयार केल्या जाणाऱ्या मेथॅक्युलॉन, कोकेन, चरस अशा ड्रग्जचाही समावेश आहे.शिक्षण अथवा नोकरीच्या निमित्ताने देशभरातील तरुण, तरुणी नवी मुंबईकडे धाव घेत आहेत. त्यांना लक्ष्य करू पाहणाऱ्या ड्रग्जमाफियांनी मागील काही वर्षांत आपले जाळे तयार केले आहे. यामुळे गांजापाठोपाठच हेरॉइन, कोकेन, चरस, एमडीसारख्या प्रयोगशाळेत तयार होणाऱ्या घातक ड्रग्जची भर पडली आहे. त्याचे धागेदोरे पाकिस्तानसह इतरही देशांशी जोडले गेले आहेत, तर २०२१ मध्ये नव्यानेच सुरू झालेला एमडी ड्रग्ज बनविण्याचा अलिबागमधील कारखानाही पोलिसांनी वेळीच उद्ध्वस्त केला होता.

कोणत्या वर्षी किती कारवाई?

  • २०२३ - नऊ महिन्यांत १६ कोटी ३४ लाखांचे २४५ किलो ३५९ ग्रॅम ड्रग्ज जप्त केले.
  • २०२२ - ३६८ कोटी ३७ लाखांचे १११ किलो अमली पदार्थ जप्त. एकाच कारवाईत कंटेनरमधून ३६२ कोटींचे ७२ किलो हेरॉइन जप्त केले होते.
  • २०२१ - ४ कोटी ३४ लाखांचे १०४ किलो अमली पदार्थ जप्त. २० कारवायांमध्ये ९३ किलो ५२९ ग्रॅम गांजा जप्त केला होता. 

आयुक्तांकडे सूत्रे- गतवर्षी थर्टी फस्टच्या अगोदरच खारघरमधून नायजेरियनचे ड्रग्ज विक्रीचे मोठे रॅकेट पोलिसांनी उद्ध्वस्त केले होते. पोलिस आयुक्तालय क्षेत्र पूर्णपणे ड्रग्ज फ्री करण्याची मोहीम पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी हाती घेतली आहे. गुन्हेगारांना थांगपत्ताही लागू नये, यासाठी ते स्वतः कारवाईची सूत्रे हाती घेतात. त्यामुळे चालू वर्षात आतापर्यंत छोट्या-मोठ्या कारवायांतून एकूण २४५ किलो ड्रग्ज जप्त केले आहे.

----------------------------------

नालासोपारा बनतोय नायजेरियनचा अड्डा, पोलिसांनी केले ६४६ गुन्हे दाखल

मंगेश कराळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा: नालासोपारा पूर्व आणि पश्चिम परिसराचा भाग मोठ्या प्रमाणात नायजेरियन नागरिकांचा अड्डाच बनत चालला आहे. अमली पदार्थांच्या तस्करी व विक्रीत नायजेरियन नागरिकांचा सहभाग असल्याचे गुन्हे पोलिस ठाण्यात दाखल असून, कोट्यवधीचे अमली पदार्थ जप्त केले आहे. आचोळे गाव, अलकापुरी, मोरेगाव, ओस्तवाल नगर, प्रगतीनगर, रेहमत नगर, हनुमान नगर या परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे राहतात.प्रगतीनगर परिसरात नायजेरियन लोकांनी ४ ते ५ अनधिकृत बार थाटले आहेत. मागे या बारवर तुळींज पोलिसांनी कारवाई करून तोडफोड केली होती. पण, हे बार पुन्हा सुरू करण्यात आले. शुक्रवार ते रविवार या तीन दिवसांत शेकडो नायजेरियन येऊन एकत्र रात्रभर मोठ्या आवाजात गाणी लावून पार्ट्या करतात. मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयात जानेवारी ते १५ ऑक्टोबरदरम्यान अमली पदार्थांचे ६४६ गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी साचेपाच कोटींचा अमली पदार्थांचा साठा पकडला आहे.

भारतीय महिलांशी विवाह- शहरात राहण्यासाठी काही नायजेरियनने अनोखी शक्कल लढवत आर्थिक व्यवहार करून काही भारतीय महिलांशी लग्न केले आहे तर काहींनी फक्त नावाला लग्न करून कागदोपत्री येथे राहत असल्याचा पुरावा गोळा केला आहे. तर काहींनी मुंबईमधील अनेक पोलिस ठाण्यांतर्गत अमली पदार्थांचे गुन्हे दाखल करून अटक झाल्यावर सुटून आल्यानंतर आपले बस्तान नालासोपारा शहरात मांडले आहे.

पोलिसांनी वेळीच लक्ष घातले नाही तर स्थानिकांना डोकेदुखी ठरणार आहे. नायजेरियन लोकांना घरे देणाऱ्यांवर कडक कारवाई केली पाहिजे. नालासोपारा शहरात यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.- प्रवीण गुरव, स्थानिक रहिवासी.

-----------------------------------

कशी होते ड्रग्जची तस्करी?

मनाेज गडनीस, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अमली पदार्थांची तस्करी हा तपास यंत्रणांसाठी तसा नवा मुद्दा नाही. मात्र, केंद्रीय यंत्रणांनी गेल्या काही महिन्यांत अमली पदार्थांची जी तस्करी पडकली आहे, त्यात तस्करांनी अनेक क्लृप्त्या वापरल्याचे दिसून आले.

काही अभिनव युक्त्या

  • परदेशातून येताना अमली पदार्थ हे कॅप्सूलमध्ये भरायचे व त्या कॅप्सूल गिळायच्या. भारतामध्ये आल्यानंतर विशिष्ट औषध घेत, विष्ठेद्वारे त्या गोळ्या बाहेर काढत, त्यातील अमली पदार्थ बाहेर काढत, त्यांचे वितरण होते.
  • आफ्रिका खंडातून येणारे अनेक तस्कर अमली पदार्थांच्या गोळ्या प्लास्टिक पिशव्या किंवा कॅप्सूलमध्ये भरून त्या गुदद्वारामार्गे शरीरात घुसवतात. इथे आल्यानंतर त्या बाहेर काढून त्यांचे वितरण होते.
  • अलीकडच्या काळात काही इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी करत त्याच्या आतमध्ये अमली पदार्थ दडवून आणले जातात.
  • प्रवासासाठी ट्रॉली बॅगा किंवा परिधान केलेली जीन्स याच्या आतमध्ये चोरकप्पे करून त्यामध्येदेखील अमली पदार्थ दडवले जातात.
  • मध्यंतरी मुंबईतील दोन तरुणांनी चक्क परदेशातून पोस्टाद्वारे अमली पदार्थ मागवले होते. मुंबईतील परदेशी पोस्ट विभागात ते पार्सल दाखल झाले. मात्र, याचा सुगावा लागल्यानंतर सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करत ते अमली पदार्थ हस्तगत करतानाच दोन स्वतंत्र घटनांत चौघांना अटक केली आहे.

समुद्रमार्गेही तस्करी

परदेशातून सामानासाठी कन्टेनर बुक करायचा. त्या कन्टेनरद्वारे जे सामान येणार आहे ते केवळ ३० ते ४० टक्केच भरायचे किंवा अगदी १०० टक्के तेच सामान ठेवत त्याच्या खालील बाजूस अमली पदार्थ लपवायचे आणि तशी तस्करी करायची. ज्यावेळी पोर्टवर जहाज येते त्यावेळी प्रत्येक कन्टेनर किंवा कन्टेनरमधील प्रत्येक सामानाची सखोल तपासणी होत नाही. बहुतांश अधिकारी केवळ चालानवर नमूद केलेले सामान व त्यावर भरलेले शुल्क आदींची तपासणी करतात. त्यामुळे या मार्गाद्वारे होणाऱ्या तस्करीचे प्रमाणदेखील लक्षणीय आहे.

-----------------------------------------

ड्रग्जची ही आहेत पुरवठा केंद्रे

  • कोकेन : मीरा रोड, नालासोपारा, खारघर, उलवे, चकाला, अंधेरी, मिनारा मस्जीद, मोहम्मद अली रोड, वांद्रे 
  • एलएसडी : युरोपीय देशांतून येणारे एलएसडी हे ड्रग्ज गोरेगाव, मालाड, अंधेरी / लोखंडवाला येथून पुरवले जातात.
  • हेरॉईन : अफगाणिस्तानातून इराण व तेथून न्हावाशेवामार्गे हे ड्रग्ज मुंबईत येते. धारावी, कुर्ला, मुंबई सेंट्रल येथून याचा पुरवठा होतो. 
  • चरस : हिमाचल, जम्मू काश्मीर आणि नेपाळ भागातून येणारे चरसचे मुंबईत कुर्ला बैल बाजार, वर्सोवा, प्रतीक्षा नगर, किंग सर्कल, अंधेरी, डोंगरी, भायखळा, ठाणे येथे सप्लाय सेंटर आहेत.
  • मेफेड्रोन :  रासायनिक कारखान्यातून तयार होणाऱ्या एमडी हा कॉलेज परिसरासह वर्सोवा, कुर्ला, वसई, अंधेरी, लोखंडवाला, डोंगरी, मीरा रोड, नालासोपारा, वांद्रे येथून तो पुरवला जातो.
  • गांजा : आंध्र प्रदेश आणि ओरिसातून तयार होणारा गांजा ठाण्यातील उत्तन मार्गे मुंबईत पुरवठा केला जातो. तर धुळे, जळगाव, शिरपूर, उत्तन भागात याची अवैध शेती केली जाते.

---------------------------------

ड्रग्जसाठी कोडवर्ड 

  • ‘एक मीटर कपडा दो’ म्हणजे एक किलो एमडी
  • ‘एक पॉट’ म्हणजे एक किलो गांजा
  • ‘आईज’ म्हणजे एम्फेटामाइन, चरससाठी क्रीम, हेरॉईनसाठी जादू की पुडिया
  • ‘स्मँक’ म्हणजे हेरॉईन
  • ‘एक चिबा’ म्हणजे एक किलो चरस
  • गांजासाठी ‘न्याहरी’

-------------------------------------------

तरुणाईला आकर्षित करण्यासाठी काही पण...

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: तरुणाईला आकर्षित करण्यासाठी ईव्हेन्ट कंपन्या स्वत:चे वेगळे पेज नेटवर्किंग साइटवर तयार करून पार्ट्यांचे आयोजन करतात, तर काही इव्हेंट कंपन्या फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सॲपचा वापर करून अशा पार्ट्यांचे आयोजन करतात. यासाठी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी होते. पार्टीचे आयोजन करणाऱ्या ईव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांकडून रेव्ह पार्टी, असा थेट उल्लेख न करता वेगवेगळ्या प्रकारचे कोड वर्ड वापरत असल्याचे तपासात समोर आले आहे. या पार्ट्यांकडे पोलिसांचे विशेष लक्ष असते. मुंबईत कारवाईचा वेग वाढल्याने ही मंडळी मुंबईबाहेर पार्ट्यांसाठी धडपड करताना दिसतात.

डार्कवेब नेटवर्कवरून एका क्लिकवर ड्रग्ज

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मायानगरी मुंबईतील एकेकाळी स्टेटस सिम्बॉल असलेली महागडी विदेशी दारू, सिगारेट यांच्या क्रेझची जागा हळूहळू अमली पदार्थांनी घेत चरस, हेरॉईन, गांजा, कोकेन आणि गांजा, हुक्का यांच्या धुरांड्या हवेत विरू लागल्या. पुढील काळात स्वस्तात आणि सहज उपलब्ध होणाऱ्या एमडीसारख्या केमिकलयुक्त ड्रग्जने डोके वर काढले. दक्षिण मुंबई, मध्य मुंबई आणि पश्चिम उपनगरांतील कुलाबा, फोर्ट, गिरगाव, मरिन लाईन्स, डोंगरी, वरळी, दादर, माहीम, वांद्रे, खार, जुहू, सांताक्रुझ, अंधेरी, ओशिवरा, मालाड, मढ, मार्वे, गोराई अशा उच्चभ्रू वस्तीत असलेले पब, हुक्का पार्लर, रेस्टॉरंट आणि पंचतारांकित हॉटेलमधे स्टेट्स सिम्बॉल म्हणून जात असलेल्या तरुणाईला ड्रग्जची लत लागली आहे. कारवाईच्या कचाट्यातून वाचण्यासाठी ही मंडळी डार्कवेबद्वारे एका क्लिकवर घरपोच ड्रग्ज मागवत आहेत. 

कुरिअर कंपन्या रडारवर...

  • कुरिअर कंपनीद्वारे पाठविण्यात येणाऱ्या ड्रग्ज पार्सलवरील नाव, पत्ता बनावट असल्याचेही तपासात समोर आले आहे. तसेच कुणाच्याही लक्षात येणार नाही, अशा पद्धतीने हे ड्रग्ज लपविण्यात आले होते. 
  • पहिल्यांदाच अशाप्रकारे तस्करीचे नवे प्रकार समोर आल्याचे दिसून आले. त्यामुळे यात कुरिअर कंपन्यांचा काही सहभाग आहे का? याबाबत यंत्रणा अधिक तपास करत आहे. विविध कुरिअर कंपन्या रडारवर आहेत.

-----------------------

कारखाने की ड्रग्जनिर्मितीचे अड्डे? अंकुश ठेवण्याचे यंत्रणांसमोर आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गेल्या काही दिवसांत मुंबई पोलिसांनी नाशिक, सोलापूर, संगलीसह विविध ठिकाणचे ड्रग्जनिर्मितीचे कारखाने उद्ध्वस्त करून हजारो कोटींचे ड्रग्ज आणि कच्चा माल जप्त केला आहे. त्यामुळे, राज्यातील विविध भागांत असलेल्या केमिकल कारखान्यांच्या आडून उभारले गेलेले ड्रग्जचे एक मोठे साम्राज्य समोर आले. आता, अशा केमिकल कारखान्यांवर अंकुश ठेवण्याचे आव्हान सर्वच यंत्रणांसमोर उभे ठाकले आहे. मुंबईसह राज्यभरात हजारो केमिकल उत्पादन आणि प्रक्रिया करणारे कारखाने आहेत. सद्य:स्थितीत या कारखान्यांत नेमके काय सुरू आहे, याकडे यंत्रणांचे दुर्लक्ष झाल्यामुळे या कारखान्यांच्या आडून ड्रग्जचा काळाधंदा राजरोस सुरू असल्याचे स्थानिक पोलिसांसह मुंबई पोलिस, गुन्हे शाखा, एनसीबी, डीआरआय अशा तपास यंत्रणांनी वेळोवेळी केलेल्या कारवाईतून समोर आले आहे.

नाशिक येथील अमली पदार्थांचा कारखाना मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त करत मास्टरमाइंड ललित पाटीलला अटक केली. या कारवाईत पोलिसांनी ३०० कोटींचे १५० किलो एमडी ड्रग्ज जप्त केले. त्यानंतर आणखी १०० कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात पोलिसांना यश आले. नाशिकपाठोपाठ सोलापुरातील ड्रग्ज फॅक्टरी पोलिसांनी उद्ध्वस्त केली. राहुल आणि अतुल गवळी हे दोघे सख्खे भाऊ ही फॅक्टरी चालवत होते. त्यांच्याकडून १६ कोटी रुपये किमतीचा आठ किलो एमडी साठा जप्त करण्यात आला. तर, १०० कोटींचा ६० किलोचा निर्माणाधीन एमडी साठाही जप्त करण्यात आला.

गवळी बंधू पूर्वी एका रासायनिक कारखान्यात काम करायचे. तेथूनच त्यांनी ड्रग्ज निर्मितीसंदर्भातील प्रक्रिया सुरू केली. या अनुभवातूनच गवळी बंधूंनी सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसी परिसरात २१ हजार चौरस फुटांचा कारखाना महिना ३० हजार रुपये भाडेतत्त्वावर चालवायला घेतला होता. तेथेच तीन लॅब तयार करून ड्रग्जनिर्मिती सुरू करण्यात आली होती. गेल्या सात-आठ महिन्यांपासून त्याचा हा कारनामा सुरू होता.

----------------------------------------

व्यसनमुक्ती केंद्रात प्रतिदिन दीडशेंची हजेरी

सीमा महांगडे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: व्यसन हा शारीरिक, मानसिक, कौटुंबिक आणि सामाजिक स्वरूपाचा आजार असला तरी त्यावर नियंत्रण ठेवता येते. औषधे आणि समुपदेशन यांच्या मदतीने व्यसनाची मानसिक ओढ कमी करण्याचा, त्यावर मात करण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. याच उपचारपद्धतीसाठी अंधेरीतल्या भटारवाडीतील अमली पदार्थ व्यसनमुक्ती उपचार केंद्रात दररोज १५० हून अधिक रुग्ण हजेरी लावतात. या सर्वांचे औषधाेपचारासोबत समुपदेशन करण्यात येते.व्यसनमुक्तीसाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे २० ते ३० वयोगटातील असल्याची माहिती केंद्रातील आरोग्य अधिकारी देतात. महिन्याला सरासरी व्यसनमुक्तीसाठी २० ते २२ रुग्ण प्रवेश घेत असतात. रोज इथे साधारणतः २०० रुग्ण हजेरी लावत असतात, त्यामधील १५० रुग्ण हे ब्राऊन शुगरच्या व्यसनापासून दूर राहण्यासाठी उपचार घेत आहेत.

व्यसनमुक्तीसाठी हे विभाग कार्यरत

  • मुंबईत येणार अमली पदार्थांचा साठा, त्याची होत असलेली मागणी आणि पुरवठा यामुळे तरुणाईत व्यसनांचे प्रमाण वाढत आहे. शहरातील व्यसनमुक्ती उपक्रमासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाकडून ही प्रयत्न केला जात आहे. पालिकेच्या जीटी, केईएम, राजावाडी अशा जवळपास बहुतांश रुग्णालयांत व्यसनमुक्तीसाठी विभाग कार्यरत आहे.
  • भटारवाडी येथे स्वतंत्र व्यसनमुक्ती उपचार केंद्र सुरू आहे. व्यसनांपासून ज्या रुग्णांना कायमची मुक्ती हवी असते, अशा रुग्णांसाठी ओपीडी पातळीवर उपचार दिले जातात.
टॅग्स :अमली पदार्थमुंबईनवी मुंबईनालासोपाराठाणे