मुंबई : वैद्यकीय शिक्षणाच्या बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विशेष फेरी घेण्यात येणार आहे. त्यासाठी नोंदणीला सीईटी सेलने सुरुवात केली असून आज, सोमवारी नोंदणी आणि कॉलेजचे पर्याय निवडण्याचा शेवटचा दिवस आहे. तर २४ डिसेंबरला गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ११ डिसेंबर ते १९ डिसेंबरदरम्यान राबविण्यात आलेल्या ऑनलाइन रिक्त फेरीत काही विद्यार्थ्यांनी कॉलेज मिळूनही त्या जागांवर प्रवेश घेतले नव्हते. तसेच बीएएमएस आणि बीएचएमएस अभ्यासक्रमाच्या प्रत्येकी एका कॉलेजला यंदा नव्याने मान्यता मिळाली आहे. त्यातून बीएएमएस अभ्यासक्रमासाठी १०० जागा, तर बीएचएमएस अभ्यासक्रमासाठी ६० जागा नव्याने उपलब्ध झाल्या आहेत. त्या जागांचा तेथील प्रवेश प्रक्रियेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ही विशेष फेरी घेतली जाणार आहे.
असे असेल वेळापत्रक
प्रवेश फेरीसाठी २३ डिसेंबरपर्यंत कॉलेजचे पर्याय निवडता येणार.
गुणवत्ता यादी २४ डिसेंबरला जाहीर होणार
कागदपत्रांसह कॉलेजमध्ये जाऊन २५ डिसेंबर ते २८ डिसेंबरदरम्यान प्रवेश घेता येणार
प्रवेशाची अंतिम मुदत ३१ डिसेंबर असेल.
... तर कारवाई
विशेष फेरीसाठी विद्यार्थ्यांना नव्याने कॉलेजचे पर्याय निवडावे लागणार आहेत. गुणवत्ता यादीत जागा मिळालेल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणे विद्यार्थ्यांना बंधनकारक असेल. तसेच जे विद्यार्थी प्रवेश घेणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे पर्याय निवडताना विद्यार्थ्यांनी त्यांना प्रवेश घ्यायचा आहे अशाच कॉलेजचे पर्याय द्यावेत, असे आवाहन सीईटी सेलने केले आहे.
आठवडाभरात सीईटी नोंदणी
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षांसाठी नोंदणीला या आठवड्यापासून सुरुवात होणार आहे. यासाठीची तयारी पूर्ण झाल्याचे सीईटी सेलकडून सांगण्यात आले. सीईटी सेलकडून विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते. यंदा या प्रवेश परीक्षांना १६ मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्याचे तात्पुरते वेळापत्रक सीईटी सेलने गेल्या महिन्यात जाहीर केले होते. आता या प्रवेश परीक्षांच्या नोंदणीला या आठवड्यापासून सुरुवात केली जाणार आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात इंजिनिअरिंग, फार्मसी आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेच्या नोंदणीला सुरुवात केली जाणार आहे. यंदा सीईटी सेलकडून कला, तंत्रशिक्षण, उच्च शिक्षण आणि वैद्यकीय शिक्षण या चार विभागांच्या १९ अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार मार्च आणि एप्रिल महिन्यात या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. मे अखेरपर्यंत या परीक्षांचे निकाल जाहीर करण्याचे नियोजन सीईटी सेलने केले आहे.
...या अभ्यासक्रमांची नोंदणी प्रक्रीया
एमएड, एमपीएड, एमबीए / एमएमएस, एलएलबी ३ वर्षे, एमसीए, बीएड, बीपीएड, एमएचएमसीटी, बीएचएमसीटी, बीए एड, बीएससी बीएड, बीएड, एमएड, बी डिझाइन.