मुंबई : एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांच्या कमला मिलच्या वाहनतळामध्ये झालेल्या हत्येनंतर मुंबईतील अशा स्वरूपाच्या मोठ्या वाहनतळांमध्ये विजेच्या व्यवस्थेसह सीसीटीव्ही आणि सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याच्या सूचना देण्यात येणार असल्याचे मुंबईचे कायदा व सुव्यवस्थेचे सहपोलीस आयुक्त देवेन भारती यांनी सांगितले.कमला मिलमध्ये पाच मजली वाहनतळ आहे. येथे पार्क केलेल्या कारकडे गेलेल्या संघवी यांची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर ३ तास आरोपी वाहनतळावरच होता. वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेने सर्वांचीच झोप उडवली. येथील सुरक्षारक्षकांच्या समोरून गाडीतूनच संघवी यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी कडक पावले उचलली.वाहनतळावर विजेबरोबर सीसीटीव्हीची व्यवस्था हवी, त्याच्यावर सतत देखरेख असायला हवी. शिवाय सुरक्षा व्यवस्था वाढविण्याबाबत मुंबई पोलिसांकडून त्यांना सूचना देण्यात येणार असल्याचे भारती यांनी सांगितले.
मुंबईतील वाहनतळांवर विशेष सुरक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 5:31 AM