Join us  

हॉटेल, उपाहारगृहांच्या स्वच्छता मानांकनासाठी  केंद्रीय अन्न सुरक्षा प्राधिकरणाची विशेष योजना 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2023 10:00 AM

स्वच्छता मानांकन योजनेसाठी १३ डिसेंबरपर्यंत मुदत.

मुंबई : केंद्रीय अन्न सुरक्षा प्राधिकरणाच्या वतीने आता हाॅटेल, रेस्टाॅरंट, उपाहारगृह, मिठाई - बेकरी दुकाने आणि अन्य दुकानांसाठी स्वच्छता मानांकनाची विशेष ऐच्छिक योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी १३ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची प्रक्रियेची अंतिम मुदत असल्याचे आवाहन अन्न सुरक्षा प्राधिकरण प्रशासनाने केले आहे.  

अशी आहे प्रक्रिया :

स्वच्छता मानांकन हे स्वमूल्यांकन व स्वतंत्र कंपनीच्या ऑडिटद्वारे प्रमाणित करण्यात येते. या योजनेंतर्गत अन्न व व्यावसायिकांना आस्थापनेमध्ये अन्न सुरक्षाविषयक करण्यात येत असलेल्या उपाययोजना व त्याचे पालन याबाबत ग्राहकांचा विश्वास प्राप्त करण्याची संधी मिळत आहे.  

असा करा अर्ज :

जास्तीत जास्त शासकीय, निमशासकीय व खासगी हॉटेल, रेस्टॉरंट, कॅन्टिन, मिठाईचे दुकाने, बेकरी आदी अन्न आस्थापनांनी या योजनेमध्ये सहभाग घेता येणार आहे, तरी पात्र अन्न आस्थापनांनी जिल्हा कार्यक्षेत्रातील सहायक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन कार्यालयात वा केंद्रीय अन्न सुरक्षा प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर अर्ज करावा. पात्र संस्थांना प्रक्रिया पूर्ण केल्यास त्वरित स्वच्छता मानांकन  करण्यात येणार आहे.

याची होणार पडताळणी:

या प्रक्रियेत हाॅटेल, रेस्टाॅरंट, उपहारगृह, मिठाई - बेकरी दुकाने आणि अन्य दुकानांनी स्वयंपाकगृहात काटेकोरपणे स्वच्छतेचे नियम, भांड्यांची नियमित स्वच्छता, हातमोजे वापरणे इ. पाळणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे, आवारातील कचराकुंड्या, त्यांची झाकणे, खाद्यपदार्थांची साठवणूक याचे निकष पडताळण्यात येणार आहे.

अन्न सुरक्षा प्राधिकरण देईल प्रमाणपत्र :

अन्न सुरक्षेची ही प्रक्रिया पूर्ण केल्यास ग्राहकांना उच्च मानांकित स्वच्छतेविषयक प्रमाणपत्र प्राप्त हाॅटेल, दुकानांमध्ये अन्न सुरक्षाविषयक नियमांचे पालन होत असल्याची हमी मिळेल. हे प्रमाणपत्र अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्लीमार्फत देण्यात येणार आहे.

टॅग्स :मुंबईहॉटेल