Join us

योग दिनानिमित्त टपाल विभागाची विशेष मोहोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 4:06 AM

मुंबई : आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून भारतीय टपाल कार्यालयाने विशेष मोहोर (शिक्का) तयार केली आहे. सोमवारी त्याचे अनावरण ...

मुंबई : आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून भारतीय टपाल कार्यालयाने विशेष मोहोर (शिक्का) तयार केली आहे. सोमवारी त्याचे अनावरण करण्यात आले.

योग दिनानिमित्त जगभरात वेगवेगळे उपक्रम राबविले जात असताना टपाल विभागाने अनोखी मोहोर तयार करीत या दिवसाचे महत्त्व वेगळ्या पद्धतीने अधोरेखित केले आहे. योगासने करणाऱ्या व्यक्तीची भावमुद्रा आणि ‘आंतरराष्ट्रीय’ योग दिवस असा हिंदीसह इंग्रजी भाषेतील मजकूर या शिक्क्यावर देण्यात आला आहे. सोमवारी देशभरातील ८१० मुख्य टपाल कार्यालयांत त्याचे अनावरण करण्यात आले.

सण-उत्सव किंवा एखादा विशेष दिवस साजरा केला जात असताना टपाल विभागाकडून त्या दिवशी नेहमीपेक्षा वेगळी मोहोर उमटवली जाते. पोस्टाची तिकिटे, शिक्क्यांचा संग्रह करणाऱ्यांसाठी ही पर्वणी असते. योगदिनाच्या शिक्क्यालाही संग्राहकांचा मोठा प्रतिसाद लाभला. केवळ एकच दिवस आणि तेही १० ते ५ या वेळेत पोस्टाशी संबंधित कागदपत्रांवर ही विशेष मोहोर उमटवली जाणार असल्याने संग्राहकांनी जवळच्या टपाल कार्यालयाकडे धाव घेतली. मुंबईतील सर्व मुख्य टपाल कार्यालयात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

गेल्या काही वर्षांपासून आंतराष्ट्रीय योग दिवस टपाल तिकिटांच्या संग्राहकांसाठी पर्वणी ठरत आहे. २०१५ मध्ये टपाल विभागाने या दिवसानिमित्त दोन तिकिटांचा संच आणि एक लघु पत्रक जारी केले होते. २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूर्यनमस्काराचे टपाल तिकीट जारी केले. तर २०१७ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या टपाल विभागाने न्यूयॉर्कमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचे स्मरण करण्यासाठी १० योगासने दर्शविणाऱ्या टपाल तिकिटांचा संच जारी केला होता.