राज्यात प्रतिपिंडाचा अभ्यास करण्यासाठी विशेष सेरो सर्वेक्षणाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:09 AM2021-08-12T04:09:49+5:302021-08-12T04:09:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट अजूनही ओसरलेली नाही. त्यामुळे एकीकडे निर्बंध शिथिल करत असताना दुसरीकडे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट अजूनही ओसरलेली नाही. त्यामुळे एकीकडे निर्बंध शिथिल करत असताना दुसरीकडे राज्यात सामान्यांच्या शरीरातील प्रतिपिंडाचे प्रमाण अभ्यासण्यासाठी विशेष सेरो सर्वेक्षणाची गरज असल्याचे मत राज्याच्या टास्क फोर्समधील डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.
राज्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. पूर्णपणे अजून कोरोनामुक्त झालेलो नाही. लोकल प्रवासाची मुभा हा निर्णय मोठा आहे, त्यामुळे अशा स्वरुपाचे प्रशासकीय निर्णय घेत असताना तळागाळात जाऊन संसर्गाची सद्यस्थिती अभ्यासली पाहिजे. सेरो सर्वेक्षण याचा अर्थ रक्तद्रवाची तपासणी करायला हवी. रक्तद्रव हा रक्ताचा पिवळ्या रंगाचा घटक असून, त्यामध्ये रक्तपेशी वगळता प्रथिने आणि अन्य घटक असतात. त्यामध्ये प्रतिपिंडा(ॲण्टीबॉडी)चा समावेश असतो. या रक्तद्रवाची पाहणी केल्यानंतर कोणत्याही संसर्गजन्य रोगाविरोधात लढण्यासाठी तयार झालेल्या प्रतिपिंडांचा अंदाज येत असतो. कोरोनाविरुद्ध विकसित झालेल्या ॲण्टीबॉडी तपासण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात येते, असे डॉक्टरांनी नमूद केले.
डॉ. जोशी यांनी विश्लेषण करताना सांगितले की, शरीरात प्रतिपिंड निर्माण झाले असले तरीही गाफिल राहता कामा नये. ब्राझिलच्या लोकसंख्येत सेरो सर्वेक्षणादरम्यान ७० टक्के नागरिकांच्या शरीरात प्रतिपिंड निर्माण झाल्याचे समोर आले, असे असतानाही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका त्यांना सहन करावा लागला. यापूर्वीच्या लाटांमध्ये केलेल्या चुका टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. धार्मिक स्थळे, सार्वजनिक कार्यक्रम आणि शाळा अशा गर्दी असलेल्या ठिकाणी संसर्गाचा धोका अधिक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.