Join us

मुस्लीम बांधवांच्या दफनविधीसाठी 'विशेष पथक' नियुक्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 3:05 PM

कोरोनामुळे मृत्यु झाल्यास करणार मार्गदर्शन; पालकमंत्री अस्लम शेख यांचा पुढाकार

 

मुंबई: कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मुस्लीम बांधवांच्या दफनविधीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी एका 'विशेष पथकाची' नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली जुमा मस्जिद सह रझा अकॅडमी आणि अन्य मुस्लिम संस्थांनी याबाबत पुढाकार घेतला. मालवणीतील पासष्ट वर्षीय मुस्लीम व्यक्तीच्या दहनविधीमुळे या बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. त्यानुसार एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.कोरोनाच्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह योग्य ती काळजी घेत लवकरात लवकर नष्ट करणे आवश्यक असते. अन्यथा इतरांना देखील त्याचा संसर्ग होऊ शकतो. मालवणी परिसरात देखील दोन आठवड्यापूर्वी ६५ वर्षांच्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मात्र त्यांना दफन करण्यास संबंधित दफनभूमीच्या विश्वस्थानी नकार दिला. त्यामुळे त्यांचे अंत्यसंस्कार हिंदू धर्मानुसार करण्यात आले. याप्रकाराबाबत समजताच मुस्लिम बांधवांकडून या कृतीचा निषेध केला जाऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली जाऊ लागली. त्यानुसार शेख यांनी जुमा मस्जिद, रझा अकॅडमी आणि मुस्लीम संस्थांच्या सदस्यांचा सहभाग असलेली एक बैठक मुंबईत करवली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मुस्लिम व्यक्तीचा दफनविधी करताना कोरोना विषाणूचा प्रसार होणार नाही याची काळजी कशी घेता येईल याबाबत हे पथक मार्गदर्शन करणार आहे. पथकामध्ये २५ ते ३० लोकांचा समावेश असुन कोरोना रुग्णाच्या अंत्यविधीसाठी लागणारे विशिष्ट किट त्यांना मोफत उपलब्ध करून दिले जाणार असुन ते वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) तसेच आरोग्य खात्याच्या मार्गदर्शक तत्वानुसार असेल', अशी माहिती जुमा मस्जिद ट्रस्टचे प्रमुख शोएब खातीब यांनी दिली. तसेच जर मयताच्या नातेवाईकांना अंत्यविधी करण्याची इच्छा असेल तर त्यांनाही याबाबत योग्य ते मार्गदर्शन केले जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. मरिन लाईन्स येथील बडा कब्रस्थान याठिकाणी ७०० कबरी उपलब्ध आहेत. तसेच कुर्ला,  माहिम, वर्सोवा आणि गोरेगाव पूर्व परिसरात देखील याची सोय करण्यात आली आहे. याबाबत मार्गदर्शन हवे असल्यास सबीर निर्बन(9821030829),शोएब खातीब (9833708378/ 9833423342) आणि इर्फान शेख( 09892272585) या क्रमांकावर संपर्क करण्याची विनंतीही करण्यात आली आहे.पथकाचे नेमके काम काय?कोरोनामुळे मृत्यू झालेल्या इसमाचा मृतदेह आणि किट कसे हाताळायचे, दफनविधी कसा करायचा, त्यापूर्वी आणि नंतर कबर निर्जंतुक कशी करायची याबाबत या पथकाकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. अन्य ठिकाणीही जर या पथकाचे मार्गदर्शन लागले तर आमचे प्रतिनिधी त्याठिकाणी जात त्यांना मदत करतील अशी माहिती या पथकाचे सदस्य सबिर निर्बन यांनी दिले. या पथकाच्या वेतनाची जबाबदारी शेख यांनी घेतली आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस