मुंबई – २६ नोव्हेंबर २००८ रोजी शहर दहशतवादी हल्ल्यानं हादरलं होतं. १३ वर्षापूर्वी जेव्हा पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब आणि त्याचा साथीदार कामा हॉस्पिटलमध्ये अंधाधुंद गोळीबार करत होते. अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले. त्याच गोळीबारीत हॉस्पिटलमध्ये एका चिमुकलीनं जन्म घेतला. मृत्यूच्या दहशतीमध्ये या मुलीचा जन्म झाला होता. त्यामुळे तिचं नाव गोली ठेवण्यात आलं.
मागील १३ वर्षापासून मुंबईकरांच्या मनात या दहशतवादी हल्ल्याच्या कटू आठवणी ताज्या आहेत. गोलीचा या दिवशी वाढदिवस असतो परंतु तिने आजपर्यंत कधीच तिचा वाढदिवस साजरा केला नाही. या दिवशी गोली आणि तिचं कुटुंब मृत्युमुखी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहतात. अनोखा योगायोग म्हणजे गोलीची छोटी बहीण जयश्री ही १३ फ्रेब्रुवारी २०१० रोजी पुण्यातील जर्मन बेकरी स्फोटावेळी जन्मली होती. गोलीची आई विजू सांगतात की, त्यादिवशी संध्याकाळचे ७ वाजले होते. मला प्रचंड वेदना होऊ लागल्या. मी माझे पती शामू लक्ष्मणराव यांच्यासोबत कामा हॉस्पिटलला निघाली. हॉस्पिटलला पोहचताच डॉक्टरांनी मला रुग्णालयात दाखल केले. पतीला औषधं आणण्यासाठी पाठवलं. ९.३० वाजता मला दुसऱ्या वॉर्डला शिफ्ट केले. बाहेर काय चाललंय त्याची काहीच कल्पना मला नव्हती. थोड्या वेळाने अचानक गोळीबारीचा आवाज कानी ऐकू आला. तेव्हा मी खूप घाबरले.
डॉक्टर मला सोडून तिथून गेले. गोंधळ झाला. सर्वजण इकडून तिकडे पळू लागले. १५-२० लोकं वार्डात शिरले. सर्व घाबरलेले होते. कुणी खिडक्या बंद करत होतं तर कुणी पर्दा लावत होतं. तेव्हा कुणी विजूला लेबरवार्डला घेऊन जा असं म्हंटल. मला घाम फुटला होता. मी खूप भयभीत झाली होती. बाहेर गोळीबारीचा आवाज येत होता. भीतीपोटी मी ओरडूही शकत नव्हते. वेदनेने मी व्याकुळ झाले होते. याचवेळी माझ्या मुलीने या जगात जन्म घेतला. नर्सनं मुलीचं वजन केले आणि तिला झोपवलं. १०-१५ मिनिटांनी नर्स आली आणि मला जमिनीवर गादी टाकून झोपवलं. गोळीबार सुरु होता त्यामुळे खोलीची लाईट बंद केली होती. माझ्यासोबत ५ वर्षाचा मुलगाही होता. खोलीत अनेक महिला होत्या. CST स्टेशनवरुन काहीजण पळून आले होते असं विजूने सांगितले.
तर डॉक्टरांनी मला औषधं आणण्यासाठी पाठवलं होतं. मी लिफ्टमध्ये पोहचलो तेव्हा गोळीबारीचा आवाज ऐकला. मला वाटलं भारताच्या विजयामुळे फटाके फोडले जात असतील. मी औषधं आणायला जात असल्याचं सुरक्षा रक्षकाला सांगितले. त्यानंतर मी सीडीवरुन खाली उतरत होतो. तेव्हा रस्त्यावर येताच मला समोर भयानक दृश्य पाहायला मिळालं. लिफ्टमॅनलाही गोळी लागली होती. त्याच्या पोटातून रक्त वाहत होतं. मी घाबरलेल्या अवस्थेत होतो. मी ओरडत पुन्हा हॉस्पिटलमध्ये गेलो आणि लोकांना एका वार्डात जाण्यास सांगितले. वार्डाचे दरवाजे बंद केले असं गोलीच्या वडिलांनी सांगितले.
दरम्यान डिलीव्हरीनंतर CST स्टेशनवरुन आलेली महिला गोळीबारीचा घटना मला सांगत होती. तेव्हा मी घाबरले. तेव्हाच नवजात चिमुकलीला जाग आली मी तिला दूध पाजलं. नर्स आणि डॉक्टरने मला विचारलं काही खाल्लं का? तेव्हा मी काही खाल्लं नव्हतं म्हणून त्यांनी फळं आणून दिली. हा सगळा प्रकार गोळीबारीच्या घटनेत सुरु होता. तेव्हापासून मी माझ्या मुलीचं नाव गोली ठेवलं. काही लोकं तर एके ४७ ही बोलतात असं तिच्या आईनं सांगितले.