मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाच्या निर्णयावर आनंद व्यक्त करत उच्च न्यायालयाचे आभार मानले. तसेच, मराठा समाजाचे अभिनंदन करताना, छत्रपती संभाजीराजे भोसले यांचे विशेष आभार मानले. तर सकल मराठा समाजातील सर्व संघटना आणि त्यांचे संघटक यांचेही मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचा माहिती देतात, विधिमंडळात छत्रपती शिवाजी महाराज की जयचा जयघोष झाला.
हायकोर्टाने आज जो निकाल दिला आहे ते आपल्यासाठी आनंदाची बाब आहे. सभागृहाने केलेला कायदा कोर्टात वैध असल्याचं ठरलं आहे. राज्य सरकारने मागासवर्गीय आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी सांगितले होते त्या आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा समाज मागास असल्याचं कोर्टात सांगितले गेले. 50 टक्क्यांहून अधिक आरक्षण देण्याचा राज्य सरकारला अधिकार आहे. राज्य सरकारने 16 टक्के आरक्षण दिलं होतं पण ते कोर्टाने नाकारलं. पण 12 टक्के नोकरीत आणि 13 टक्के शिक्षणात आरक्षण देण्याची शिफारस मागासवर्गीय आयोगाने दिली होती त्याप्रमाणे आरक्षण दिल आहे. मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा आणण्यासाठी दोन्ही सभागृहाने साथ दिली त्याचे मी आभार मानतो असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच, विशेषत: छत्रपती संभाजीराजे यांचे मी आभार मानतो. संभाजीराजे यांनी मराठा समाजातील आंदोलकांना ज्याप्रमाणे मुद्दा पटवून दिला, त्यानंतर मराठा समाजानेही न्यायालयीन निर्णय येईपर्यंत वाट पाहिली. त्यामुळे छत्रपती संभाजीराजे यांच्यासह इतरही मराठा आंदोलकांच्या संघटकांचे मा आभार मानतो असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.
काय म्हणाले संभाजीराजे मराठा समाजाला प्रदीर्घ संघर्षानंतर मिळालेल्या आरक्षणाचा आनंद झाला आहे. मराठा आरक्षण टिकणं हे महत्वाचं होतं, किती टक्के हा दुसरा मुद्दा आहे. कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केलं पाहिजे, पदवीधरपर्यंत मोफत शिक्षण शक्य नाही. मग, बारावीपर्यंत मोफत शिक्षण द्यावं, अशी मागणी केली. राज्यसभेतही बारावीपर्यंत मोफत शिक्षण देण्याचा मुद्दा आज मी मांडला आहे, असे छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी म्हटले आहे. मी मराठा समाजातील सर्व संबंधित घटक, संघटना आणि मराठा समाजाचे अभिनंदन करतो.