मुंबई : जुहू विमानतळावर तैनात असलेल्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाच्या जवानांसाठी नुकतेच विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. आपत्कालीन स्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण आणि अग्निसुरक्षा नियमांबाबत माहिती त्यांना देण्यात आली.
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या १९३ जवानांनी यात सहभाग घेतला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर नियमांचे पालन करण्यासाठी जवानांची १० तुकड्यांमध्ये विभागणी करण्यात आली. आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास काय करावे, याची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. अग्निशमन यंत्रांची हाताळणी, आग लागण्याची प्राथमिक कारणे, आगीवर ताबा मिळविण्यासाठी करावयाचे उपाय, आपत्कालीन परिस्थितीत प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी घ्यावयाची काळजी यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणाचा प्रत्येक जवानाला भविष्यात फायदा होईल, अशी माहिती जुहू विमानतळाचे संचालक अशोक कुमार वर्मा यांनी दिली.
त्याशिवाय कोरोनाकाळात घ्यावयाच्या काळजीबाबत स्वतः संचालकांनी जवानांना मार्गदर्शन केले. आहार आणि जीवनशैलीत नियोजनपूर्वक बदल केल्यास प्रतिकारशक्ती वाढून शरीर रोगमुक्त राहण्यास मदत होते, असा सल्ला या वेळी वर्मा यांनी दिला.
............
(फोटोओळ – महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाच्या जवानांना जुहू विमानतळावर आपत्कालीन स्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.)