Join us

होळीसाठी कोकण रेल्वे सोडणार विशेष गाड्या; नियम शिथिल झाल्याने चाकरमानी खूश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 10:07 AM

काेरोनाच्या महामारीमुळे गेल्या दोन वर्षात होळीसाठी चाकरमान्यांना कोकणात जाता आले नाही. परंतु आता परिस्थिती नियंत्रणात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : होळीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेने दोन अतिरिक्त  गाड्यांची घोषणा केली आहे. मध्य रेल्वेच्या समन्वयातून पुणे जंक्शन-करमाळी -पुणे जंक्शन आणि करमाळी-पनवेल-करमाळी या दोन विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत.  

काेरोनाच्या महामारीमुळे गेल्या दोन वर्षात होळीसाठी चाकरमान्यांना कोकणात जाता आले नाही. परंतु आता परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे कोरोनाविषयक सर्व निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. सर्व व्यवहार पूर्ववत झाल्याने होळीसाठी चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने सुध्दा कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुणे जंक्शन ते करमाळी ही साप्ताहिक विशेष गाडी ११ आणि १८ मार्च रोजी सांयकाळी ५.३० वाजता पुणे जंक्शन येथून सुटणार आहे. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता करमाळी येथे पोहचणार आहे. तर करमाळी येथून पुणे जंक्शनसाठी ही गाडी रविवार १३ मार्च आणि २० मार्च रोजी सकाळी ९.३० वाजता सुटणार आहे. ही गाडी लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम या स्थानकांवर थांबणार आहे. तर करमाळी - पनवेल ही दुसरी साप्ताहिक विशेष गाडी करमाळी येथून शनिवार १२ आणि १९ मार्च रोजी सकाळी ९.२० वाजता सुटेल, असे कोकण रेल्वेकडून कळविण्यात आले आहे.

टॅग्स :होळीरेल्वे