मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत राज्यात ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये विशेष लसीकरण मोहीम- डॉ. दीपक सावंत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 06:22 PM2018-10-09T18:22:51+5:302018-10-09T18:22:59+5:30

नियमित लसीकरण मोहिमेव्यतिरिक्त मिशन इंद्रधनुष्य अभियानांतर्गत 2018 अखेर 90 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Special Vaccination Campaign - October to December under the Mission Rainbow. Deepak Sawant | मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत राज्यात ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये विशेष लसीकरण मोहीम- डॉ. दीपक सावंत

मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत राज्यात ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये विशेष लसीकरण मोहीम- डॉ. दीपक सावंत

Next

मुंबई : नियमित लसीकरण मोहिमेव्यतिरिक्त मिशन इंद्रधनुष्य अभियानांतर्गत 2018 अखेर 90 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासंदर्भात आज केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याशी संवाद साधला. महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यांतील प्रत्येक 22 तारखेला दोन वर्षांच्या आतील बालके आणि गरोदर मातांना विशेष लसीकरण करण्यात येणार आहे, असे आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले. या विशेष लसीकरण मोहिमेच्या तयारीबाबत आढावा आज घेण्यात आला.

केंद्र शासनाच्या वतीने मिशन इंद्रधनुष्य राबविण्यात येते. राज्यातील जळगाव, धुळे, सांगली, कोल्हापूर, पालघर, रायगड या सहा जिल्ह्यांमध्ये नियमित लसीकरणाव्यतिरिक्त राबविण्यात येते. दोन वर्षांच्या आतील बालके, गरोदर मातांना सर्व प्रकारच्या लसी या अंतर्गत देण्यात येतात. 2018 अखेर संपूर्ण देशात मिशन इंद्रधनुष्यच्या माध्यमातून 90 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करायचे असल्याने संपूर्ण देशात ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार महाराष्ट्राने लसीकरणाचे नियोजन केले असून, तीनही महिन्यातील प्रत्येक 22 तारखेला ती राबविण्यात येणार असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.

या विशेष मोहिमेकरीता आरोग्य विभागामार्फत सहा जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षण शिबीर, कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे घरोघरी जाऊन लसीकरणाबाबत सर्व्हे देखील करण्यात येत आहे. राज्यस्तरावर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती नेमण्यात आली असून या समितीमार्फत विशेष लसीकरण मोहिमेचा आढावा घेण्यात येईल. त्याचप्रमाणे राज्य कृती दल आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आला आहे. या सहाही जिल्ह्यांमध्ये सर्व प्रकारच्या लसींचा साठा पुरेसा असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी आरोग्य विभागाचे प्रदान सचिव डॉ. प्रदीप व्यास, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त अनुपकुमार यादव, संचालक डॉ. संजीव काबळे, सहसंचालक डॉ. अर्चना पाटील उपस्थित होते.

Web Title: Special Vaccination Campaign - October to December under the Mission Rainbow. Deepak Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.