Join us

बहीणभावाचे प्रेम वृद्धिंगत करण्यासाठी खास पाकीेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 3:59 AM

टपाल खात्याची रक्षाबंधन भेट । किंमतही अतिशय माफक

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भाऊबहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक हे रक्षाबंधन सण मानला जातो. या दिवशी दूर राहणाऱ्या भावाला राखी पाठवण्यासाठी टपाल खात्याने विशेष पाकीट तयार केले असून या विशेष पाकिटाची किमतही अतिशय माफक म्हणजे दहा रुपये ठेवण्यात आली आहे. या विशेष पाकिटाद्वारे भावाबहिणीमधील प्रेम अधिक वृद्धिंगत व्हावे, असा टपाल खात्याचा प्रयत्न असणार आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव कालावधीत टपाल खात्याचे कर्मचारी, अधिकारी कामावर हजर आहेत. सार्वजनिक पद्धतीने सण साजरे करण्यावर बंधने आली असली तरी घरात सण साजरा करण्यावर काही बंधने नाहीत. रक्षाबंधनाच्या माध्यमातून सध्याच्या नकारात्मक वातावरणात काहीशी सकारात्मक भावना होऊ शकेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

रक्षाबंधनासाठी टपाल खात्याने तयार केलेल्या कलात्मकतेने हे टपाल विशेष पाकीट तयार करण्यात आले आहे. कमीत कमी वेळात या पाकिटाच्या माध्यमातून राखी बहिणीकडून भावाकडे पोचावी व त्याद्वारे बहिणीचे प्रेमही भावाला मिळावे, असा टपाल खात्याचा प्रयत्न आहे. तरुणाई व लहान मुलामुलींना आवडेल अशा प्रकारे हे पाकीट तयार करण्यात आले आहे. हे पाकीट पावसाळी वातावरणात टिकेल, अशा पद्धतीने तयार करण्यात आले आहे.

टपाल खात्याच्या मुंबई विभागाच्या पोस्ट मास्टर जनरल स्वाती पांडे याबाबत म्हणाल्या, रक्षाबंधनाच्या निमित्ताने टपाल खात्याने कोरोनाच्या लॉकडाऊन कालावधीत या प्रकारे भाऊबहिणीमधील पवित्र प्रेमाचा सण अधिक चांगल्या प्रकारे साजरा करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. याला चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास पांडे यांनी व्यक्त केला. आजपासून हे पाकीट ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आले आहे.

टॅग्स :रक्षाबंधनपोस्ट ऑफिस