मुंबई: माता व बालमृत्यु दरात घट होण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ राज्यातील 11 लाख 6 हजार 400 लाभार्थींनी घेतला असून त्यांच्या थेट बँक खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे. या योजनेच्या अधिक प्रभावी अंमलबजावणीकरीता 8 डिसेंबर पर्यंत विशेष सप्ताह आयोजित करण्यात आला आहे, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.
महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत मजूरीसाठी जावे लागते. प्रसुतीनंतरही त्यांना मजुरी करावी लागते. यामुळे नवजात बालकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. ही परिस्थिती लक्षात घेता दारिद्रय रेषेखालील व दारिद्रय रेषेवरील गर्भवती महिलांसाठी प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरु आहे. या योजनेंतर्गत शासनाने अधिसूचित केलेल्या आरोग्य संस्थेत नोंदणी केलेल्या गर्भवती महिलेला तीन टप्प्यांमध्ये एकूण 5 हजार रुपयांची रक्कम तिच्या बँक खात्यात जमा केली जाते.
राज्यात आतापर्यंत 12 लाख 87 हजार 84 एवढे लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली असून 11 लाख 6 हजार 400 लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे. योजनेच्या अधिक प्रभावी अंमलबजावणीकरीता आजपासून ते दि. 8 डिसेंबर 2019 पर्यंत विशेष सप्ताह आयोजित केला असून आरोग्यदायी राष्ट्र उभारण्याच्या दिशेने ‘सुरक्षित जननी विकसित धारिणी’ हे ब्रिद वाक्य घेऊन लाभार्थ्यांची नोंदणी मोहिम सुरु करण्यात आली आहे. आशा कार्यकर्ती, एएनएम, अंगणवाडी कार्यकर्ती यांच्याकडे आवश्यक ते कागदपत्र देऊन नोंदणी करायची आहे, असे आरोग्य संचालक डॉ.अर्चना पाटील यांनी सांगितले.
लाभार्थीचे तसेच तिच्या पतीचे आधारकार्ड, आधार संलग्न बँक अथवा टपाल कार्यालयातील खात्याचा तपशील, माता बालसंगोपन कार्ड आणि बाळाचे जन्मनोंदणी प्रमाणपत्र ही कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असल्याचे आरोग्य विभागामार्फत सांगण्यात आले आहे.