हार्बरवर धावली महिला विशेष लोकल
By admin | Published: March 9, 2017 03:41 AM2017-03-09T03:41:52+5:302017-03-09T03:41:52+5:30
जागतिक महिला दिनानिमित्ताने हार्बर मार्गावर सीएसटी ते पनवेल अशी महिला विशेष लोकल बुधवारी संध्याकाळी चालवण्यात आली.
मुंबई : जागतिक महिला दिनानिमित्ताने हार्बर मार्गावर सीएसटी ते पनवेल अशी महिला विशेष लोकल बुधवारी संध्याकाळी चालवण्यात आली. ही लोकल मोटरवुमन सुरेखा यादव यांनी चालवली. तर लोकलच्या गार्ड म्हणून श्वेता घोणे यांनी जबाबदारी सांभाळली.
महिला दिनानिमित्ताने मध्य रेल्वेच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १वर संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मध्य रेल्वे महाव्यवस्थापक डी.के. शर्मा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक रवींद्र गोयल, मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील, जनसंपर्क अधिकारी ए.के. सिंह यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. महिला दिनानिमित्ताने मध्य रेल्वेकडून संध्याकाळी ६.0५च्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक १वरून सीएसटी ते पनवेल अशी महिला विशेष लोकल सोडण्यात येणार होती. हार्बरवरील लोकल चालवण्याची जबाबदारी ही मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील मोटरवुमन सुरेखा यादव यांच्याकडे देण्यात आली होती. त्याचबरोबर या लोकलमधून महिला तिकीट तपासणीस, महिला रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनीही प्रवास केला. ही लोकल महिला विशेष असल्याने विविध आकर्षक फुलांनी सजवण्यात आली होती. महिला प्रवाशांनीही ही लोकल येताच तिचे टाळ्या वाजवत स्वागत केले. या वेळी मोटरवुमन सुरेखा यादव यांनी रेल्वेत आपण मोटरवुमन असल्याचा अभिमान असल्याचे सांगितले. महत्त्वाची बाब म्हणजे मध्य रेल्वेवर मेल-एक्स्प्रेस चालवणारी लोकोपायलटही महिला असून, त्यांचे नाव मुमताझ काझी आहे. (प्रतिनिधी)