हावलीला वेसावा कोळीवाड्यात निघाली नेत्रदिपक "मडकी मिरवणूक"
By मनोहर कुंभेजकर | Published: March 25, 2024 04:35 PM2024-03-25T16:35:16+5:302024-03-25T16:35:27+5:30
काल रात्री डोक्यावर मडकी घेऊन पारंपारिक वेषात वेसावे गावातून कोळी महिलांची निघालेली नेत्रदीपक मडकी मिरवणूक तसेच विविध रूपे परिधान करून येथील कोळी बांधवानी सादर केलेली सोंगे हे यंदाचे येथील खास आकर्षण होते.
मुंबई-वेसावे कोळीवाड्यात हावलीची परंपरा काही औरच आहे.हावली निमित्त ' बाजार गल्ली कोळी जमात ' आणि ' मांडवी गल्ली कोळी जमाती' च्या महिलांची मडकी मिरवणुक काढण्याची पूर्वापार परंपरा आहे. काल मध्यरात्री शिमग्याला गावच्या पाटलाने अग्नी दिल्या नंतर वेसावकर कोळी नृत्य करत आनंदोत्सव साजरा केला. मुंबई सारख्या वेगाने बदलणाऱ्या शहरात देखील कोळी बांधवांनी आपली संस्कृती व परंपरा टिकवली आहे. हावली व रंगपंचमी सण साजरा करताना वेसाव्यातील कोळी बांधवांच्या आनंदाला उधाण आले होते अशी अशी माहिती मच्छिमार नेते प्रवीण भावे यांनी दिली.
काल रात्री डोक्यावर मडकी घेऊन पारंपारिक वेषात वेसावे गावातून कोळी महिलांची निघालेली नेत्रदीपक मडकी मिरवणूक तसेच विविध रूपे परिधान करून येथील कोळी बांधवानी सादर केलेली सोंगे हे यंदाचे येथील खास आकर्षण होते. येथील बाजार गल्ली कोळी जमात व मांडवी गल्ली कोळी जमातीच्या कोळी महिलांनी आपल्या पारंपरिक वेषात कोळी स्त्रियांनी या नेत्रदिपक मिरवणुकीत सहभाग घेतला, गावातील मुख्य रस्त्यातून ही मिरवणूक काढण्यात आली. सदर दोन्ही मंडळ या मिरवणुकीचे आयोजन अनेक दशकांपासून करत आहेत. अशी माहिती बाजार गल्ली कोळी समाज संस्थेचे अध्यक्ष मयूर फोका व मांडवी गल्ली कोळी समाज संस्थेचे अध्यक्ष वीरेंद्र मासळी यांनी दिली.
वेसावा शिवकर कोळी समाज ट्रस्ट तर्फे शिवगल्लीत होळी जल्लोषात साजरा केली.यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष विजय भानजी, सेक्रेटरी संजोग भानजी आणि कार्यकारी मंडळ, गल्लीच्या सर्व सभासदांनी उपस्थित राहून होळी उत्सवात साजरी केली.
शिमगा हा कोळी बांधवांचा महत्वाचा सण असल्यामुळे या दिवसाचे महत्व म्हणजे वेसाव्याच्या कोळी बांधवांनी आपल्या होड्यांची रंगरंगोटी करून त्यावर छान रंगीत बावटे (झेंडे), पताके व मखमली झालर लावून सजावट केली होती. बोटींची यथासांग कोळी महिलांनी पूजा करून नैवेद्य दाखवला अशी माहिती कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके यांनी दिली.