वेसावा कोळीवाड्याची नेत्रदीपक "मटकी मिरवणूक"
By मनोहर कुंभेजकर | Published: March 7, 2023 06:39 PM2023-03-07T18:39:19+5:302023-03-07T18:40:01+5:30
गेली तीन वर्षे कोविड मुळे वेसावकरांना हावली साजरी करता आली नव्हती.
मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: गेली तीन वर्षे कोविड मुळे वेसावकरांना हावली साजरी करता आली नव्हती.मात्र आता कोविड मुंबईतून हद्दपार झाला असतांना मुंबईतील सर्वात मोठा असणाऱ्या वेसावे कोळीवाडा हावली पारंपरिक पद्धतीने साजरी केली. काल रात्री डोक्यावर मडकी घेऊन पारंपारिक वेषात वेसावे गावातून कोळी महिलांची निघालेली नेत्रदीपक मिरवणूक तसेच विविध रूपे परिधान करून येथील कोळी बांधवानी सादर केलेली सोंगे हे यंदाचे येथील खास आकर्षण होते.
येथील बाजार गल्ली कोळी जमात व मांडवी गल्ली कोळी जमातीच्या कोळी महिलांनी आपल्या पारंपरिक वेषात कोळी स्त्रियांनी या नेत्रदिपक मिरवणुकीत सहभाग घेतला, गावातील मुख्य रस्त्यातून ही मिरवणूक पूर्ण गावाची फेरी करून आली. तरुण आणि मुले या मिरवणुकीत विविध शिमग्याची सोंगे होती आणि होळी उत्सवाचा उत्साह जिवंत ठेवला. सदर दोन्ही मंडळ या मिरवणुकीचे आयोजन अनेक दशकांपासून करत आहेत. तसेच ते मटकी मिरवणुकीची ते आवर्जून वाट पाहतात आणि आपल्या इतर पाहुणे मंडळींनासुद्धा यासाठी आमंत्रित करतात अशी माहिती
बाजार गल्ली कोळी जमातीचे अध्यक्ष पराग भावे व मांडवी गल्ली कोळी जमातीचे अध्यक्ष विकास बाजीराव यांनी दिली.
मत्स्यव्यवसाय खाते, महाराष्ट्र राज्य यांच्या सौजन्याने व मुंबईकर फोल्क्स आणि अखिल कोळी समाज व संस्कृती संवर्धन संघ यांचा कोळी बोली भाषा व कोळी संस्कृती संवर्धनासाठी आणि कोळीवाडा सांस्कृतिक पर्यटन वॉकला चालना देण्यासाठी वेसावचा शिमगा - कोळीवाडा कल्चर टुरिझम वॉक"चे आयोजन केले होते.देशी व विदेशी पर्यटक, नागरिक, अभ्यासक यांनी वेसाव्याच्या कोळयांच्या शिमगा व कोळी संस्कृतीचा आनंद लुटला अशी माहिती मुंबईकर फोल्क्स हे यु ट्युब व इंस्टाग्राम पेज चालवणारे वेसावे गावातील मोहित रामले यांनी ही माहिती दिली.
वेसावे कोळीवाड्यात हावलीची परंपरा काही औरच आहे.हावली निमित्त ' बाजार गल्ली कोळी जमात ' आणि ' मांडवी गल्ली कोळी जमाती' च्या महिलांची मडकी मिरवणुक काढण्याची पूर्वापार परंपरा आहे. उद्या मध्यरात्री शिमग्याला गावच्या पाटलाने अग्नी दिल्या नंतर वेसावकर कोळी नृत्य करत आनंदोत्सव साजरा करतात. मुंबई सारख्या वेगाने बदलणाऱ्या शहरात देखील कोळी बांधवांनी आपली संस्कृती व परंपरा टिकवली आहे. हावली व रंगपंचमी सण साजरा करताना वेसाव्यातील कोळी बांधवांच्या आनंदाला आलेले उधाण खरच पाहण्यासारखे असते अशी माहिती वेसावा कोळी जमात ट्रस्टचे अध्यक्ष राजहंस टपके व सचिव लक्षित चिपे यांनी लोकमतला दिली.
शिमगा हा कोळी बांधवांचा महत्वाचा सण असल्यामुळे या दिवसाचे महत्व म्हणजे वेसाव्याच्या कोळी बांधवांनी आपल्या होड्यांची रंगरंगोटी करून त्यावर छान रंगीत बावटे (झेंडे), पताके व मखमली झालर लावून सजावट केली होती. आणि बोटींची यथासांग कोळी महिलांनी पूजा करून नैवेद्य दाखवला अशी माहिती वेसावा नाखवा मंडळाचे देवेंद्र काळे व महेंद्र लडगे यांनी दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"