Join us

‘स्पेक्ट्रम आॅफ द सीज’ आजपासून मुंबईकरांच्या सेवेत , साडेपाच हजार प्रवासी क्षमता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 6:38 AM

मुंबई व देशातील पर्यटकांचा कल समुद्री पर्यटनाकडे वाढत असल्याने नवनवीन क्रुझची सेवा सुरू होत आहे.

मुंबई : मुंबई व देशातील पर्यटकांचा कल समुद्री पर्यटनाकडे वाढत असल्याने नवनवीन क्रुझची सेवा सुरू होत आहे. याच पार्श्वभूमीवर तब्बल ५ हजार ६२२ प्रवाशांना एकाच वेळी समुद्री पर्यटनाला घेऊन जाण्याची क्षमता असलेल्या टायरन कंपनीच्या ‘स्पेक्ट्रम आॅफ द सीज’ या जहाजाची सेवा गुरुवारपासून मुंबईकरांसाठी उपलब्ध होईल.रॉयल कॅरेबियन समूहाची ही क्रुझ क्वॉन्टम अल्ट्रा दर्जाची आहे. स्पेक्ट्रम आॅफ द सीज हे भारतात आलेले आतापर्यंतचे सर्वांत मोठे जहाज आहे. या जहाजाच्या माध्यमातून भारतीय प्रवाशांना आशियातील इतर प्रेक्षणीय ठिकाणी समुद्रमार्गे जाण्याची संधी उपलब्ध होईल. या जहाजाची लांबी ११३९ फूट आहे. ही लांबी आशियातील सध्याच्या मोठ्या जहाजापेक्षा जास्त आहे. या जहाजामध्ये स्काय पॅड, व्हर्चुअल रिअ‍ॅलिटी अशा विविध सुविधा आहेत. अल्टिमेट फॅमिली सूट सुविधा असून इन-रूम स्लाईड तसेच नावीन्यपूर्ण डायनिंग संकल्पना आहे. जगभरातील खाद्यपदार्थ या जहाजावर उपलब्ध असतील. याशिवाय तीन मजली मुख्य डायनिंग रूम असून त्यामध्ये आंतरराष्ट्रीय आणि आशियाई अला कार्ट पर्याय, सेलिब्रिटी शेफ जेमी आॅलिव्हरद्वारा जेमीज इटालियन इझुमी जपानी कुझीन, अस्सल सिचुआन पदार्थ पुरवणारे सिचुआनरेड हे नवीन स्पेशालिटी रेस्टॉरंट आणि लीफ अँड बीन ही पारंपरिक टी रूम आणि कॅफे पार्लर देखील येथे उपलब्ध आहेत.या ताफ्यात स्टार मोमेंट ही एक नवीन जागा आहे. काचेच्या नॉर्थ स्टार एलिव्हेटेड कॅप्सूल, रिपकॉर्ड हे आयफ्लाय स्कायडायव्हिंग सिम्युलेटर, फ्लोराईडर हे सर्फिंग स्टिम्युलेटर, बायोनिक बार ही येथील वैशिष्ट्ये आहेत.भारतीय प्रवाशांना मुंबई ते सिंगापूर प्रवासाचा पर्याय आहे. यामध्ये पर्यटक दुबई, ओमानमधील मस्कत, कोचीन, मलेशियातील पेनांग आणि सिंगापूर या आशियातील अप्रतिम बंदरांचे सौंदर्य अनुभवू शकतात.याबाबत टायरन ट्रॅव्हेल मार्केटिंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी वरुण चड्ढा म्हणाले, भारत हे क्रुझिंगसाठीचे विकसनशील मार्केट आहे. स्पेक्ट्रमद्वारे भारतीय क्रुझप्रेमींना रॉयल कॅरिबियनच्या सेवासुविधा आणि बोटीवर साहसी, उत्साहाने परिपूर्ण अशा प्रवासाचा आनंद घेण्याची संधी मिळेल.आशियाई देशातील प्रवाशांना आकर्षित करू शकेल, अशा पद्धतीने या जहाजाची बांधणी करण्यात आली आहे. जहाजाच्या पुढील टोकावर प्रवाशांसाठी क्रूझ लाइनचे पहिले खासगी एन्क्लेव्ह आहे. आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना खास कार्ड की प्रवेश, खासगी एलिव्हेटर आणि आरामासाठी बाहेर जागा तसेच रेस्टोरंट आणि लाउंज अशा विविध सुविधा आहेत.

टॅग्स :महाराष्ट्रमुंबई