Join us

राज ठाकरे आणि आशिष शेलारांच्या मैत्रीत मिठाचा खडा; म्हणाले, "मित्र होते, विषय आता संपला"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 14:52 IST

राज आणि उद्धव ​​यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर आशिष शेलार यांनी मोठे विधान केले आहे.

Ashish Shelar on Uddhav Thackeray and Raj Thackeray: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा समीकरणे बदलताना दिसत आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत उद्धव ठाकरेंसोबतच्या संभाव्य युतीबाबत सकारात्मक दृष्टिकोन दाखवला. त्यावर उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे आणि  उद्धव ठाकरे यांच्यात दोन दशकांच्या कटुतेनंतर समेट घडवून आणण्याच्या दिशेने चर्चा सुरू असताना विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र यामुळे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आणि राज ठाकरे यांच्या मैत्रीत मिठाचा खडा पडल्याची चर्चा सुरु झाली आहे. 

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याबाबत एकमेकांना दिलेल्या सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटले. ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या चर्चेवर महाविकास आघाडीसह महायुतीच्या नेत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या. तसेच दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार चर्चा सुरु झाली आहे. मात्र राज ठाकरे यांच्यासह मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या आशिष शेलार यांनी त्यांच्याशी असलेले वैयक्तकिक संबंध संपल्याचं म्हटलं आहे. तसेच मविआतील शरद पवार गटाने ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर आनंद असल्याचेही आशिष शेलार म्हणाले.

"वैयक्तिक वगैरे आत्तापर्यंतचे जे शब्द होते ते पुरे करा. माझ्या दृष्टीने वैयक्तिक मित्र होते तो विषय आता संपला, राजकीय भाष्य इतकंच करेन त्या दोघांचा प्रश्न आहे. ते दोन पक्ष आहेत त्यांनी ठरवावं," असं विधान आशिष शेलार यांनी केले आहे.

"एकाने साद घातली आहे, एकाने अट घातली आहे. पण ती अट आहे की कट आहे ते दोघांनी ठरवावे. त्यांनी आपआपसात ठरवले तर त्यांना शुभेच्छा आहेत. सगळ्यांनी आपापल्या कुटुंबात सुखी रहावे आमचे काहीही म्हणणे नाही. तो आनंदाचा विषय आहे," असेही आशिष शेलार म्हणाले.

दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंसमोर कुठलीही अट घातली नसल्याचे संजय राऊत म्हणाले. "उद्धव ठाकरेंनी कोणतीही अट ठेवलेली नाही. फक्त महाराष्ट्र हिताला सर्वोच्च प्राधान्य आणि महाराष्ट्र हिताच्या शत्रूंबरोबर यापुढे हात मिळवणी करणार नाही, ही आमच्या पक्षाची भूमिका आहे आणि ती उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. प्रमुखांनी भाष्य केल्यावर बाकी मनसे नेत्यांनी कशाला वाद हवा?," असा सवाल संजय राऊत यांनी केला. 

टॅग्स :आशीष शेलारराज ठाकरेउद्धव ठाकरे