Join us

एल्गार परिषदेत केलेले भाषण आक्षेपार्ह नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2021 4:05 AM

शरजिल उस्मानीची गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धावएल्गार परिषदेत केलेले भाषण आक्षेपार्ह नाहीशरजिल उस्मानी : गुन्हा रद्द ...

शरजिल उस्मानीची गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव

एल्गार परिषदेत केलेले भाषण आक्षेपार्ह नाही

शरजिल उस्मानी : गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : एल्गार परिषदेत चिथावणीखोर भाषण दिल्याबद्दल पुण्यात नोंदविण्यात आलेला गुन्हा रद्द करावा, याठी अलीगढ मुस्लीम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी नेता शरजिल उस्मानी (२३) याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. एल्गार परिषदेतील भाषण आक्षेपार्ह नसल्याचे त्याचे म्हणणे आहे.

२ फेब्रुवारी २०२१ रोजी पुणे येथील स्वारगेट पोलीस ठाण्यात शरजिल याच्याविरोधात आयपीसी कलम १५३ (ए) (धर्म, वर्ण व ठिकाण यावरून भिन्न गटांत शत्रुत्व निर्माण करणे) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. भारतीय जनता युवा मोर्चाचे सचिव व एबीव्हीपीचे माजी सदस्य प्रदीप गावडे यांनी शरजिल विरोधात पोलिसांकडे तक्रार केली. तक्रारीनुसार, शरजिल याने हिंदू समाज, भारतीय न्यायव्यवस्था आणि लोकसभेबाबत आक्षेपार्ह भाष्य केले.

उस्मानीने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. भाषण करण्यापूर्वी किंवा नंतर घटनास्थळावर असंतोष किंवा हिंसाचार झाला नाही. समाजातील जातीय सलोखा बिघडविण्यासाठी आणि फौजदारी न्यायव्यवस्थेचा ससेमिरा पाठी लावून खुलेपणाने व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्यावर आळा घालण्यासाठी असे गुन्हे नोंदविण्यात येतात, असे उस्मानीने याचिकेत म्हटले आहे.

३० जानेवारी २०२१ रोजी पुण्यात कोरेगाव-भीमा लढाईच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शांततापूर्ण मेळाव्यात आपण भाषण केले, असे उस्मानीने याचिकेत नमूद केले. आपल्यावर नोंदविलेला गुन्हा तथ्यहीन आहे. आपल्या भाषणातील काही विधाने संदर्भ न देता उचलण्यात आली आहेत. भाषणात मी सद्यस्थितीतील समाजरचना आणि समस्या याबाबत बोललो आहे आणि या समस्येवर उपायही सांगितला आहे. केवळ लोकांना समस्या समजावी, यासाठी काही कठोर शब्द वापरले, असेही उस्मानीने याचिकेत नमूद केले आहे.

......................