Join us

ते भाषण एखाद्या गँग लीडरचं होतं, भाजपचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 2:29 PM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं वर्धापन दिनाचं भाषण हे एका सरकारच्या प्रमुखाचं नसून गँगच्या प्रमुखाचं भाषण होतं, असे भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय.

ठळक मुद्देदोन दिवसांपूर्वी आम्ही गुंड आहोत ही भाषा करायची, आणि काँग्रेस स्वबळावर लढायची भाषा केल्यावर त्यांना जोड्यानं मारायची भाषा करायची, हे आश्चर्यजनक आहे.

मुंबई - शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी सुरू केलेल्या शिवसेना पक्षाला आज 55 वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी फेसबुकद्वारे राज्यातील शिवसैनिकांशी संवाद साधला. भाषणाच्या सुरुवातीलाच हे भाषण करताना, समोर जल्लोष करणारे शिवसैनिक नसल्याने हा संवाद मला भाषण वाटत नाही, असे उद्धव ठाकरेंनी म्हटलं. उद्धव ठाकरेंनी आपल्या लाईव्ह संवादात स्वबळावर लढण्याचा नारा देणाऱ्यांना सुनावले. तसेच, हिंदुत्त्व म्हणजे काय हेही समजावून सांगितले. उद्धव ठाकरेंच्या या भाषणावरुन भाजपने त्यांच्यावर टीका केली आहे. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं वर्धापन दिनाचं भाषण हे एका सरकारच्या प्रमुखाचं नसून गँगच्या प्रमुखाचं भाषण होतं, असे भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय. मुनगंटीवार यांनी ट्विटरवरुन व्हिडिओ शेअर करत, हिंदुत्व आणि स्वबळावर भाषण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे.   दोन दिवसांपूर्वी आम्ही गुंड आहोत ही भाषा करायची, आणि काँग्रेस स्वबळावर लढायची भाषा केल्यावर त्यांना जोड्यानं मारायची भाषा करायची, हे आश्चर्यजनक आहे. उद्धव ठाकरेंच्या भाषणात हिंदुत्व काय हे त्यांनी सांगितलं, पण जनतेला ते माहितच आहे. हिंदुत्वाबद्दल तुमची भूमिका काय? हे सांगा. हे संपूर्ण भाषण केवळ खुर्चीच्या आजूबाजूला भरकटत होतं. खुर्चीच्या संदर्भातील भूमिकेचं उदात्तीकरण या भाषणात होतं. मला वाटतं हे सरकारच्या प्रमुखाचं नव्हे, तर एका गँग प्रमुखाचं भाषण होतं, अशी बोचरी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. 

मुख्यमंत्र्यांची झूल बाजूला ठेवून भाषण

मुख्यमंत्र्यांची झूल बाजूला ठेवून, मी शिवसेना कुटुंबातील माता-भगिनींशी आणि बांधवांशी संवाद साधतोय. हे 55 वर्ष सर्वच शिवसैनिकांचं आहे. शिवसैनिकांच्या आुयष्यात तीन सण असतात. बाळासाहेबांचा जन्मदिवस 23 जानेवारी, शिवसेनेची स्थापना 19 जून आणि 13 ऑगस्ट मार्मिकचा वर्धापन असलेला दिवस, हे तीन दिवस सणासारखे असतात. शिवसेना गेल्या 55 वर्षांपासून संकटांचा सामना करेतय. मी आजही संकटाचा सामना करतोय, जो संकटांचा सामना करत नाही तो शिवसैनिक कसा?, असा प्रश्नच उद्धव ठाकरेंनी विचारला. 55 वर्षे ही साधीसुधी वाटचाल नाही, शिवसेना केवळ सत्तेसाठी लढली असती, तर शिवसेना टिकलीच नसती. शिवसेना आजही शिवसैनिकांच्या जोरावरच पुढे जात आहे. 

टीकेची पर्वा करु नका

जेव्हा देशावर संकट आलं, हिंदू असल्याचं सांगताना अनेकांना भिती वाटायची, तेव्हा गर्व से कहो हम हिंदू है... हा नारा शिवसेना प्रमुखांनी दिला. त्या शिवसेना प्रमुखांची ही शिवसेना आहे. प्रांतीय शिवसेनेनं हिंदुत्त्वाचा अंगीकार केल्यावर ती इतरांसाठी धर्मांध झाली. म्हणजे, टीका करणारे हे टीका करणारच, तुम्ही टीकेची पर्वा करू नका. तुमच्या मनाला काय वाटतंय ते करा, मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी जरुर लढेल, हिंदुत्त्वासाठी लढायचं असेल तेव्हाही जरूर लढेल. पण, हिंदुत्त्व म्हणजे आमचं राष्ट्रीयत्व आहे. 

हिंदुत्व म्हणजे काय असतं शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसांना हिंदवी स्वराज्याची आठवण करुन दिली, त्यांच्या मनगटातील ताकदिची जाणीव करुन दिली, तेव्हा मराठी माणूस पेटून उठला. त्याच मराठी माणसांची ही शिवसेना आहे. मराठी माणसाच्या न्याय-हक्कासाठी, हिंदुत्त्वासाठी मी नक्कीच लढेल. हिंदुत्व आमचा देशाभिमान आहे, त्यानंतर प्रादेशिक अस्मिता असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलं. आपलं राजकारण सोडून देशावर प्रेम करणारा शिवसेनेएवढा दुसरा पक्ष नाही. हिंदुत्व म्हणजे पेटंट कंपनी नाही, हे माझचं म्हणजे हिंदुत्त्व नाही. हिंदुत्व म्हणजे आमचा श्वास आहे. आघाडी किती काळ टिकेल, हे पाहुया पुढे. 

अप्रत्यक्षपणे फडणवीसांवर केली टीका

उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात नाव न घेता विरोधकांनाही लक्ष्य केलं. विरोधकांकडून होणाऱ्या टीकेचा अप्रत्यक्ष समाचारही त्यांनी घेतला. गेल्या वर्षभरापासून आपण काय करतोय, हे आपलं कामचं बोलतंय. त्यामुळे, अनेकांना पोटदुखी होतेय, पोटात गोळा येतोय. सत्ता नसल्याने अनेकांचा जीव कासाविस होतोय, असे म्हणत नाव न घेता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं. तसेच, त्यांच्या दु:खण्याला इलाज करायला मी डॉक्टर नाही. जेव्हा राजकीय औषध द्यायची गरज आहे, तेव्हा राजकीय औषध जरुर देईल, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.  

टॅग्स :शिवसेनाउद्धव ठाकरेभाजपासुधीर मुनगंटीवार