मुंबई : गेला महिनाभर थंडावलेली प्लॅस्टिक पिशव्यांवरील कारवाई पुन्हा एकदा वेगाने येत्या शनिवारपासून सुरू होत आहे. मात्र, या वेळेस फेरीवाले आणि दुकानारांकडे प्लॅस्टिक पिशव्या आढळल्यास, त्या परिमंडळातील संबंधित अधिकाऱ्यालाच जबाबदार ठरवून कारवाई करण्याचा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.गेल्या शनिवारी प्लॅस्टिकमुक्ती दिनाच्या निमित्ताने ‘लोकमत’ने प्लॅस्टिक पिशव्यांवरील कारवाईचा आढावा घेतला होता. ‘प्लॅस्टिक पिशव्यांवरील कारवाई थंडावली’ हे वृत्त प्रसिद्ध करत फेरीवाले आणि दुकानदार कसे सर्रास प्लॅस्टिक पिशव्या वापरत आहेत, हे निदर्शनास आणले होते. सहा महिन्यांतच ही मोहीम थंडावली आहे. परिणामी, पुन्हा एकदा मंडई, बाजारांमध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा राजरोस वापर होऊ लागला आहे, याकडे लक्ष वेधण्यात आले होते. याची दखल घेऊन येत्या १५ डिसेंबरपासून संपूर्ण मुंबईत प्लॅस्टिकविरोधात आक्रमक कारवाई करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.राज्य सरकारने २३ जानेवारीपासून राज्यात प्लॅस्टिकबंदी लागू केल्यानंतर, पालिकेनेदेखील जोरदार कारवाई सुरू केली. आतापर्यंत ३० हजार किलो प्लॅस्टिक जप्त करून दीड कोटी रुपये दंडही वसूल करण्यात आला आहे. मात्र, दुकानदारांकडून होणारा विरोध आणि संरक्षणअभावी कारवाईचा वेग मंदावला होता, असे एका अधिकाºयाने सांगितले. मात्र, पालिकेने नियुक्ती केलेल्या निरीक्षकांकडून सातही परिमंडळात प्लॅस्टिकविरोधात कारवाई सुरू आहे. ही कारवाई आणखी कठोरपणे होण्यासाठी परिमंडळातील अधिकाºयांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. आगामी काळात प्लॅस्टिकविरोधात कारवाई आणखी तीव्र करण्यात येईल, असे उपायुक्त विजय बालमवार यांनी स्पष्ट केले.अशी होते कारवाईमुंबईभरात ३१० निरीक्षकांचे पथक तयार करून, प्लॅस्टिकवर कारवाई करण्यात येत आहे. या निरीक्षकांच्या ब्ल्यू स्कॉडमध्ये मार्केट, परवाना आणि आस्थापना विभागातील कर्मचाºयांचा समावेश आहे. निळा कोट आणि काळी टोपी घातलेल्या या निरीक्षकांकडून कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईत प्रत्येक दिवशी ६० हजार ते एक लाखांपर्यंत सरासरी दंड वसूल करण्यात येतो, तरी अद्याप मुंबईत काही ठिकाणी राजरोसपणे प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सुरूच असल्याचे निदर्शनास येत आहे.
प्लॅस्टिक पिशव्यांवर शनिवारपासून कारवाईला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 1:14 AM