Join us  

वेग, चपळतेच्या जोरावर बाजी मारु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 3:36 AM

२० वर्षांखालील मुलींची रग्बी ७एस अजिंक्यपद स्पर्धा आमच्यासाठी महत्त्वाची असून यास्पर्धेतून आगामी आशियाई स्पर्धेसाठी आम्ही कितपत तयार आहोत हे कळेल.

मुंबई : २० वर्षांखालील मुलींची रग्बी ७एस अजिंक्यपद स्पर्धा आमच्यासाठी महत्त्वाची असून यास्पर्धेतून आगामी आशियाई स्पर्धेसाठी आम्ही कितपत तयार आहोत हे कळेल. आम्ही वेग आणि चपळतेच्या जोरावर बाजी मारु, असा विश्वास मुंबईकर रग्बी खेळाडू आणि भारताच्या २० वर्षांखालील मुलींच्या संघाची कर्णधार रुची शेट्टी हिने ‘लोकमत’कडे व्यक्त केला.४ आणि ५ आॅगस्टला हाँगकाँग येथे आशियाई २० वर्षांखालील मुलींची रग्बी ७एस स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाºया भारताचे नेतृत्त्व मुंबईच्या रुचीकडे सोपविण्यात आले आहे. १२ खेळाडूंचा सहभाग असलेल्या भारतीय संघामध्ये रुचीसह एकूण ३ खेळाडू महाराष्ट्राचे आहेत. रुची व्यतिरिक्त गार्गी वालेकर ही अन्य मुंबईकर संघात असून कोल्हापूरच्या नीलम पाटीलचाही भारतीय संघात समावेश आहे.स्पर्धेच्या तयारीबाबत रुची म्हणाली, ‘आगामी आशियाई स्पर्धेच्या तयारीसाठी ही स्पर्धा आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंची शरीरयष्टी खूप मजबूत असते. याबाबतीत आम्ही त्यांच्यातुलनेत कमजोर पडत असलो, तरी वेग आणि चपळतेच्या जोरावर आम्ही त्यांना नक्कीच हरवू.’तसेच, ‘आज देशामध्ये रग्बीचा प्रसार वेगाने होत असल्याचा आनंद आहे. काहीवर्षांपुर्वी राष्ट्रीय संघात केवळ पुण्यातील खेळाडूंचा अधिक समावेश असायचा. परंतु आता पश्चिम बंगाल, ओडिसा, दिल्ली, महाराष्ट्रा अशा सर्व भागांतून खेळाडू संघात स्थान मिळवत आहे. विशेष म्हणजे या खेळामध्ये आजा आदिवासी विभागातील खेळाडू अधिक छाप पाडत आहेत,’ असेही रुचीने म्हटले.याआधी तीन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या रुचीने सांगितले, ‘माझ्या अनुभवाचा मी नक्कीच संघाला फायदा मिळवून देईल. पहिल्या स्पर्धेच्यावेळी मी नवखी असल्याने दडपणाखाली होते, पण वरिष्ठ खेळाडूंनी त्यावेळी मला सांभाळून घेतले. तीच जबाबदारी मी कर्णधार म्हणून या स्पर्धेत सांभाळेल.’

असा आहे भारतीय संघ : रुची शेट्टी (कर्णधार), गार्गी वालेकर,नीलम पाटील (तिघेही महाराष्ट्र), रिया बिस्ट (दिल्ली), रजनी सबर, बसंती पांगी, मंजुलता प्रधान, कबिता कस्तुरी (सर्व ओडिसा), चंदा ओराओन, स्वप्ना ओराओन, सुमन ओराओन, पुनम ओराओन (सर्व पश्चिम बंगाल)

१७ वर्षांखालील पॅरिस जागतिक स्पर्धेचा अनुभव खूप चांगला होता. विदेशी खेळाडूंकडून खूप शिकण्यास मिळाले. त्यांचे तंत्र वेगळे असून काही गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. विदेशी खेळाडू शरीरयष्टीने मजबूत आहेत, पण आम्ही स्मार्ट खेळ करु. वेग आणि चपळ या जोरावर आम्ही त्यांना हरवू शकतो. रुचीचा आंतरराष्ट्रीय अनुभव संघासाठी मोलाचा ठरेल. ती चांगली कर्णधार असून सर्व खेळाडूंवर तिचे लक्ष असते. - गार्गी वालेकर