घाटकोपर-मानखुर्द उड्डाणपुलावर वाहनवेग नियंत्रणासाठी गतिरोधक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:14 AM2021-09-02T04:14:27+5:302021-09-02T04:14:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : घाटकोपर-मानखुर्द जोड रस्त्यावरील नवीन उड्डाणपूल वाहन चालकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. यामुळे झोप उडालेले ...

Speed brakes for speed control on Ghatkopar-Mankhurd flyover | घाटकोपर-मानखुर्द उड्डाणपुलावर वाहनवेग नियंत्रणासाठी गतिरोधक

घाटकोपर-मानखुर्द उड्डाणपुलावर वाहनवेग नियंत्रणासाठी गतिरोधक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : घाटकोपर-मानखुर्द जोड रस्त्यावरील नवीन उड्डाणपूल वाहन चालकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. यामुळे झोप उडालेले महापालिका प्रशासन या उड्डाणपुलावरील वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी खबरदारी घेणार आहे. त्यानुसार पुलाच्या दोन्ही बाजूने दर पाचशे मीटर अंतरावर गतिरोधक, सीसीटीव्ही कॅमेरे, गतिरोधक दर्शक फलक, डांबराच्या पृष्ठभागावर वाहने घसरू नयेत यासाठी पृष्ठभाग खरबडीत करणे व अतिरिक्त रम्बलर्स बसविण्यात येणार आहेत.

वीरमाता जिजाबाई भोसले मार्गावर नव्याने बांधण्यात आलेला उड्डाणपूल तीन मीटर उंचीपर्यंतच्या हलक्या वाहनांसाठी १ ऑगस्टपासून खुला करण्यात आला आहे. मात्र बांधकाम सुरू झाल्यापासून हा पूल वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या पुलाच्या नामकरणाचा वाद बराच रंगला. या पुलाच्या दर्जाबाबतही साशंकता व्यक्त होत होती. मात्र या पुलावर होणाऱ्या अपघातांमुळे संचालक हवालदिल झाले आहेत. परंतु, उड्डाणपूल संरचनात्मकदृष्ट्या योग्य असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

त्यानंतरच अवजड वाहनांना प्रवेश...

या उड्डाणपुलावरील मोहिते पाटील नगर जंक्शन येथे उच्च दाबाच्या तारा कमी उंचीवरून जात असल्यामुळे वाहतुकीदरम्यान वाहनांमध्ये विद्युत प्रेरण उत्पन्न होऊन दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या उच्च दाबाच्या तारांची उंची वाढविण्यासाठी लागणाऱ्या जागेचा ताबा मिळण्यासाठी शासनाच्या महसूल विभागाकडे पालिकेमार्फत पाठपुरावा सुरू आहे. जागा ताब्यात मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमार्फत वीज तारा अधिक उंचीवर नेल्यानंतर या उड्डाणपुलावरून अवजड वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे.

पालिकेने असा केला बचाव....

या उड्डाणपुलावरील पृष्ठभागावर केंद्रीय रस्ते व वाहतूक यांच्या मानांकनाप्रमाणे व आय. आर. सी. मानकाप्रमाणे मास्टिक अस्फाल्ट टाकण्यात आले आहे. या पृष्ठभागावर ‘पृष्ठभाग निर्देशांक’ चाचणी करण्यात आली आहे. त्यात, हा पृष्ठभाग मानकाप्रमाणेच असल्याचे निदर्शनास आल्याचा बचाव प्रशासनाने केला आहे.

म्हणून होताहेत अपघात.....

हा उड्डाणपूल ५० किलोमीटर प्रतितास या वेगाने वाहन नेण्यासाठी आहे. या उड्डाणपुलावरून चार चाकी व दुचाकी वाहनचालक जास्त वेगाने वाहने चालवत असल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी, वाहनचालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात होण्याच्या घटना घडत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Web Title: Speed brakes for speed control on Ghatkopar-Mankhurd flyover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.