बुलेट ट्रेनच्या कामाला लवकरच वेग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 04:45 AM2018-09-15T04:45:59+5:302018-09-15T06:22:51+5:30
एनएचआरसीएलची माहिती; वांद्रे-कुर्ला संकुल ते दिवा बोगद्यासाठी येत्या ९० दिवसांत निविदा
- महेश चेमटे
मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुल ते दिवा बुलेट ट्रेनच्या बोगद्यासाठी येत्या ९० दिवसांत निविदा मागवण्यात येईल. सोबतच बुलेट ट्रेनच्या बोगद्यासाठी विक्रोळीत दोन ठिकाणी तर घणसोली परिसरात प्रत्येकी एक टनेल मशीन कार्यान्वित होईल, अशी माहिती नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन (एनएचआरसीएल)ने दिली.
१४ सप्टेंबर २०१७ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या उपस्थितीत साबरमती स्टेडिअमवर देशातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते. वर्षपूर्तीनंतर आता प्रत्यक्ष कामाला वेगाने सुरुवात होईल. वांद्रे-कुर्ला संकुल ते दिवा या प्रकल्पातील वांद्रे-कुर्ला संकुल हे एकमेव भुयारी स्थानक असेल. इतर सर्व स्थानके उन्नत असतील. यासाठी विक्रोळी येथील गोदरेज गोदामापासून सुमारे २०० मीटरपासून पुढील अंतरावर दोन टनेल मशीन कार्यरत करण्यात येतील. पैकी एक विक्रोळी ते वांद्रे-कुर्ला संकुल, दुसरी विक्रोळी ते दिवा या मार्गावर, तर तिसरी घणसोली येथे असेल. जमिनीपासून सुमारे ४० मीटर खोल बोगदा तयार करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात भूसंपादनाचा वाद सुरू असल्यामुळे येथे प्रकल्प सुरू होण्यास विलंब होईल. मात्र, सद्य:स्थितीत वांद्रे-कुर्ला संकुल वगळता राज्यात भू-संपादनास एनएचआरसीएलला यश आले नाही. अहमदाबाद येथील बुलेट ट्रेन प्रकल्पांतील कामाने मात्र वेग घेतला आहे.
देशातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या ५०८ किमीटर लांबीच्या बुलेट मार्गापैकी राज्यातून १५४.७६ किमी मार्ग जाईल. यात मुंबई उपनगरातून ७ किमी, ठाणे जिल्ह्यातून ३९ तर पालघर जिल्ह्यातून १०८ किमी मार्गाचा समावेश आहे.
काम समाधानकारकपणे सुरू
सद्य:स्थितीत बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम समाधानकारकपणे सुरू आहे. नियोजनानुसार वांद्रे-कुर्ला संकुल ते दिवा बोगद्यासाठी डिसेंबरपर्यंत निविदा मागवण्यात येतील. निविदा प्रक्रिया सुमारे पाच ते सहा महिन्यांत पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर टनेल मशीनच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.
- अचल खरे, व्यवस्थापकीय संचालक, नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोेरेशन