Join us

समुद्राच्या पाण्याचे नि:क्षारीकरण करण्यास अखेर वेग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 7:49 PM

Mumbai News : मुख्यमंत्री म्हणाले की, पिण्याचे पाणी २४ तास उपलब्ध करून देण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.

मुंबई - इस्त्रायल तंत्रज्ञानाद्वारे समुद्राच्या पाण्याला गोड करण्याच्या प्रकल्पाला अखेर वेग मिळाला आहे. मुंबई महापालिका व आय.डी. ई वॉटर टेक्नॉलॉजीज लि. यांच्यादरम्यान मालाड, मनोरी येथील दोनशे दशलक्ष लिटर नि:क्षारीकरण प्रकल्पाचा अहवाल तयार करण्याचा सामंजस्य करार सोमवारी करण्यात आला. हा प्रकल्प म्हणजेे एक क्रांतिकारी पाऊल असून आज आपल्या अनेक वर्षांच्या स्वप्नाला मूर्त रूप येत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात हा सामंजस्य करार करण्यात आला. या कार्यक्रमास  नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, इस्त्रायलचे महावाणिज्यदुत याकोव फिनकेलस्टाईन, आय.डी.ई वॉटर टेक्नॉलीजीचे  पदाधिकारी, पालिका आयुक्त इकबालसिंह चहल, एमएमआरडीए आयुक्त एस. श्रीनिवास उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. 

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, पिण्याचे पाणी २४ तास उपलब्ध करून देण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. मात्र यासाठी किती धरणे बांधायची आणि त्यासाठी किती झाडं तोडून जमिनीचे वाळवंट करायचे? याचा विचार करणे आणि पर्यायी मार्गाचा अवलंब करणे अगत्याचे आहे. समुद्राचे पाणी गोड करण्याचा प्रकल्प आता मुर्त रुपाला येत आहे. २०२५ पासून या प्रकल्पातून शुद्ध पाणी पुरवठा सुरु होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

चारशे द. लि. क्षमतेपर्यंत विस्तार...

मालाड येथील दोनशे दशलक्ष लिटरच्या नि:क्षारीकरण प्रकल्पाचा सामंजस्य करार हे मुंबईकरांसाठी एक महत्वाचे पाऊल आहे. भविष्यात चारशे दशलक्ष लिटर क्षमतेपर्यंत याचा विस्तार करता येऊ शकेल. पाणी सुरक्षिततेमध्ये इस्त्राईलचे तंत्रज्ञान जगविख्यात आहे. पावसाची अनिश्चितता, वाढती लोकसंख्या आणि पाण्याची वाढती मागणी पाहता पावसावर कितीकाळ अवलंबून राहायचे? त्यामुळे नि:क्षारीकरणासारख्या प्रकल्पाचे महत्व विशेषत्वाने जाणवते, असे मत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये...

* मे २०२२ पर्यंत डीपीआर तर २०२५ मध्ये प्रकल्प सुरू होणार. मुंबईकरांना मिळणार २०० दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी.

* मनोरी येथे पाण्याची गुणवत्ता तुलनात्मकदृष्टीने चांगली आहे. खुल्या समुद्राची उपलब्धता असलेले हे ठिकाण कांदळवन विरहित आणि पर्यावरण संवेदनशील क्षेत्रापासून दूर आहे. 

* करार झाल्यापासून दहा महिन्यांच्या कालावधीत सविस्तर प्रकल्प अहवाल प्राप्त होईल. हा प्रकल्प अहवाल तयार करताना समुद्रशास्त्रीय सर्वेक्षण, भुपृष्ठीय भुभौतिकशास्त्रीय सर्वेक्षण, पर्यावरण निर्धारण अभ्यास (सागरी व जमीनीवरील) आदी काम केली जाणार आहेत.

 

टॅग्स :उद्धव ठाकरेमुंबईपाणी