पालघर : पालघर जिल्ह्याचे कामकाज लवकरात लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवरून हालचालींना वेग आला आहे. आज राज्याच्या जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिव मालिनी शंकर यांनी पालघरमधील सूर्या प्रकल्पाच्या इमारतीची पाहणी करून २० जुलैच्या आत या इमारतीचा ताबा सार्वजनिक विभागाकडे देण्याचे आदेश संबंंधित अधिकाऱ्यांना दिले.पालघर या नियोजित जिल्ह्याच्या कामकाजाला १ आॅगस्ट पासून सुरूवात होणार असून राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या हस्ते या जिल्ह्याच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन होणार आहे. प्रथम जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधीक्षक या अत्यंत महत्वपूर्ण कार्यालयांच्या कामकाजाला १ आॅगस्ट रोजी सुरूवात होणार असली तरी या विभागांच्या अनुषंगाने इतर कार्यालयांची गरज लक्षात घेता जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांनी कार्यालयांची पाहाणी केली. सूर्या प्रकल्पाच्या कार्यालयाशेजारीच पाटबंधारे विभागाच्या आणखी काही इमारती असून त्यामध्ये खारभूमी, लघुपाटबंधारे, जलसंपदा इ. विभागांची कार्यालये व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आहेत. अधिकाऱ्यांच्या निवासस्थानासाठी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाजवळच असलेल्या तीन बंगल्यांची पाहणीही प्रधान सचिवांसह उपजिल्हाधिकारी शिवाजी दावभट, पाटबंधारे मुख्य अभियंते दुसाणे, तहसिलदार चंद्रसेन पवार यांनी केली. (वार्ताहर)
जिल्ह्याच्या कामकाजाच्या हालचालींना वेग
By admin | Published: July 19, 2014 12:32 AM