Join us

अग्निशमनच्या गाड्यांचा वेग वाढणार

By admin | Published: February 08, 2016 2:52 AM

टोलेजंग इमारती उभारण्यासाठी परवानगी देणारे सिडको प्रशासन आपत्ती व्यवस्थापनात फोल ठरल्याचे खारघरमधील गिरिराज हॉरिझोन इमारतीला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर पहायला मिळाले.

वैभव गायकर ,  पनवेलटोलेजंग इमारती उभारण्यासाठी परवानगी देणारे सिडको प्रशासन आपत्ती व्यवस्थापनात फोल ठरल्याचे खारघरमधील गिरिराज हॉरिझोन इमारतीला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर पहायला मिळाले. इमारतीच्या १५ व्या मजल्यापर्यंत पोहोचण्यास सक्षम यंत्रणाच नसल्याने आग वाढली आणि ३ फ्लॅट खाक झाले. तीन ते चार तासांचा कालावधी उलटल्यानंतर आग आटोक्यात आली. या घटनेनंतर सिडको प्रशासनाला जाग असून नवीन अग्निशमन यंत्रणा खरेदी करण्याच्या प्रस्तावाला गती मिळाली आहे. खारघर शहरामध्ये ४०० हून अधिक टोलेजंग इमारती आहेत. अनेक इमारतीमध्ये सक्षम अग्निशमन यंत्रणा नाही. एखादी मोठी दुर्घटना घडल्यास सिडकोकडेही पुरेशा उपाययोजना नसल्याचे दिसून येत आहे. इतक्या त्रुटी असूनही सिडको अथवा अग्निशमन दल कोणत्या आधारावर इमारतींना ना हरकत परवाना देते, हा प्रश्नच आहे. या दुर्घटनेनंतर सिडको ५५ व ७५ मीटरच्या दोन ब्रांटो स्कायलेट शिडी असलेल्या अत्याधुनिक गाड्या खरेदी करणार आहे. एका मशीनची किंमत साधारणत: १० ते १२ कोटी असल्याची माहिती खारघर अग्निशमन दलाचे अधिकारी प्रवीण बोडके यांनी दिली. यापैकी ७५ मीटर उंचीची ब्रांटो स्कायलेट मशीन ही खारघर अग्निशमन दलाला देण्यात येणार असून ही गाडी सुमारे २३ व्या मजल्यापर्यंत आग विझवू शकते. सहा महिन्यांपूर्वी सिडकोने या मशीन खरेदीसाठी हालचाल सुरु केली आहे. गाड्या खरेदीसाठी लवकरच टेंडर काढून सिडको अग्निशमन दलामध्ये या नवीन गाड्या समाविष्ट होणार आहेत.