एलबीएस मार्ग शंभर फुटांचा करण्याच्या प्रकल्पाला येणार वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 02:23 AM2020-02-19T02:23:53+5:302020-02-19T02:24:00+5:30
७९ व्यावसायिक बांधकामे तोडली : पोलीस बंदोबस्तात महापालिकेची कारवाई
मुंबई : लालबहादूर शास्त्री मार्ग हा पूर्व उपनगर व शहर यांच्या दरम्यानचा अत्यंत महत्त्वाचा रस्ता शंभर फुटांचा करण्यात येणार आहे. मात्र या मार्गावर अतिक्रमण असल्याने रस्तारुंदीकरण लांबणीवर पडले होते. गेल्याच आठवड्यात या मार्गालगतची ६१ बांधकामे पाडण्यात आली होती. त्यापाठोपाठ मंगळवारी तब्बल ७९ पात्र व्यावसायिक बांधकामे तोडण्यात आली आहेत. स्थानिकांचा विरोध होत असल्याने पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.
लालबहादूर शास्त्री मार्गावरील गोपाळ भवन ते श्रेयस जंक्शनदरम्यान सुमारे ८२० फूट लांबीच्या रस्त्यालगत दोन्ही बाजूंना प्रत्येकी सुमारे ३७ हजार ६०० चौरस फूट एवढ्या जागेत ७९ बांधकामे होती. हा रस्ता १०० फुटी करण्यासाठी आवश्यक कार्यवाही या बांधकामांमुळे रखडलेली होती. यामुळे एलबीएस मार्गावरील गोपाळ भवन ते श्रेयस जंक्शनदरम्यान आणि लगतच्या परिसरात अनेकदा वाहतूककोंडी होत असे. ही कोंडी सुटावी यासाठी बांधकामे हटवून रस्ता रेषेनुसार रस्त्याचे रुंदीकरण करण्याची गरज होती.
त्यानुसार मंगळवारी कारवाईनंतर लगेचच रस्तारुंदीकरणाचे काम
हाती घेण्यात आले आहे. या कारवाईसाठी ४१ पोलीस कर्मचारी घटनास्थळी तैनात होते. तर महापालिकेचे ७५ कामगार, कर्मचारी, अधिकारीदेखील या कारवाईसाठी कार्यरत होते. त्यामुळे एलबीएस मार्गाच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी २३ फूट, यानुसार रस्त्याची रुंदी
४६ फुटांपर्यंत वाढविणे शक्य
होईल, अशी माहिती एन विभागाचे साहाय्यक आयुक्त अजितकुमार आंबी यांनी दिली.
कारवाईसाठी एकाच वेळी केला नऊ जेसीबींचा वापर
च्एलबीएस मार्गाच्या रस्ता रेषेवर सुमारे दोन हजार २९६ फूट लांबीच्या रस्त्यालगत असणाऱ्या जागेवर ८० अनधिकृत बांधकामे गेल्या काही वर्षांत उभी राहिली होती. त्यामुळे हा रस्ता शंभर फुटांचा करण्याचा प्रकल्प बराच काळ रखडला.
च्या मार्गावरील गंगावाडी, नित्यानंद नगर, श्रेयस सिग्नल आदी परिसरात अनेकदा वाहतूककोंडी होत असे. ही कोंडी फोडण्यासाठी एलबीएस मार्गावरील वाहतूक अधिक सुलभ होण्यासाठी ही बांधकामे हटवून रस्ता रेषेनुसार रस्त्याचे रुंदीकरण करण्याची गरज होती.
च्आठ दिवसांपूर्वी पोलीस बंदोबस्तात प्रशासनाने ६१ बेकायदा बांधकामे जमीनदोस्त केली. एकाच वेळी नऊ जेसीबींद्वारे कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ होती.