Join us

राज्यात १२ लाख वाहनचालकांनी ओलांडली वेगाची मर्यादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 4:04 AM

मुंबई : रस्ते अपघातासाठी वाहनांचा वेग हे महत्त्वाचे कारण ठरत आहे. दरवर्षी जवळपास एक लाख मृत्यू होत आहेत. असे ...

मुंबई : रस्ते अपघातासाठी वाहनांचा वेग हे महत्त्वाचे कारण ठरत आहे. दरवर्षी जवळपास एक लाख मृत्यू होत आहेत. असे असले तरी वाहनचालकांची वेगाची मर्यादा आवरत नाही. राज्यात आठ महिन्यांत १२ लाख ३४ हजार १२ वाहनचालकांनी वेगाची मर्यादा ओलांडली आहे. त्यांच्याकडून १२३ कोटी ४० लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

देशभरात रस्ते अपघातांमधील मृत्यूंचे प्रमाण अत्यंत चिंताजनक असताना, याविषयीचा कायदा व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे. त्यामुळे या प्रश्नांची अत्यंत गंभीर दखल घेऊन केंद्र सरकारने मोटार वाहने कायदा, १९८८ मध्ये सुधारणा करून मोटार वाहने (दुरुस्ती) कायदा, २०१९ हा १ सप्टेंबरपासून लागू केला. त्यानुसार अधिक वेगाने गाडी चालविणे यावर एक हजार रुपये दंडात्मक कारवाई केली जाते. राज्यातील विविध महामार्गांची वेग मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. ती मर्यादा ओलांडल्यास कारवाई करण्यात येते.

वाहन अपघाताने अनेक जणांचा बळी जात आहे. त्यामध्ये भरधाव वेगाने चालविण्यामुळे अपघात होऊन मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. तरी वाहनचालकांना वेगाचा मोह आवरत नाही. स्पीडगन ही प्रणाली लावल्यापासून अधिक वेगाने वाहन चालवून झालेले अपघात कमी प्रमाणात होत आहेत, असे सामाजिक संस्थेच्या सर्वेक्षणानुसार समोर आले आहे. सुसाट वेगाने धावणाऱ्या गाड्यांना पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या प्रणालीच्या साहाय्याने स्पीड ब्रेकर लावला आहे. या प्रणालीअगोदर सुसाट गाड्यांनी अनेक अपघात शहरात घडले, ते चित्र कमी झाल्याचे सध्या दिसत आहे.

महामार्गावर कोणत्या महिन्यात किती दंड

महिना- चालान - दंड

जानेवारी- १५१४५७ - १५१४५७०००

फेब्रुवारी - १६७७०६ - १६७७०६०००

मार्च - १८६४९० - १८६४९००००

एप्रिल - ११२८८१ - ११२८८१०००

मे - १३५८३७ - १३५८३७०००

जून - १४७७४५ - १४७७४५०००

जुलै - १६१८१०- १६१८१००००

ऑगस्ट - १७००८६ - १७००८६०००

एकूण - १२३४०१२ - १२३४०१२०००