Join us

स्पीड ‘लॉक’; मुंबई डाऊन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील वाढता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीसह इतर निर्बंध आणखी कठोर करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील वाढता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीसह इतर निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. याची गुरूवारी रात्री ८ वाजल्यापासून अंमलबजावणी करण्यात आली.

मुंबईसह उपनगरात तैनात केलेला बंदोबस्त, तसेच नागरिकांनी स्वत:हून बंधने पाळल्याने रात्री ८ वाजेनंतर मुंबईतील रस्ते काही अंशी निर्मनुष्य झाले होते. विशेषत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, लाल बहादूर शास्त्री मार्ग, सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडसह पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर वेगाने वाहणारी वाहतूक वगळली, तर मुंबईच्या अंतर्गत रस्त्यांवरील रहदारी कमी झाली होती. फोर्ट, चर्चगेट, भायखळा, गिरगाव, मुंबई सेंट्रल, लालबाग लोअर परळ, वरळी, माहीम, माटुंगा, सायन, वांद्रे, कुर्ला, अंधेरी, बोरिवलीसह इतर परिसरातील रहदारी ८ वाजेनंतर बऱ्याच अंशी कमी झाली. भायखळा, दादर, कुर्ला, वांद्रे, अंधेरी, अशा मोठ्या रेल्वेस्थानकांवर रात्री ९ वाजेपर्यंत गर्दी ओसरली होती. अत्यावश्यक सेवेतील घटक वगळता उर्वरित लोक दिसत नव्हते. सीएसएमटी स्थानकात दिवसभर पोलिसांचा पहारा होता. ओळखपत्र तपासल्याशिवाय कोणत्याही प्रवाशाला स्थानकात प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळे कार्यालयातून घरी परतण्यासाठी गर्दी करणाऱ्या लोकांची तारांबळ उडाली होती.