CoronaVirus News: राजभवनात हालचालींना वेग; भेटीगाठीमुळे चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 03:40 AM2020-05-26T03:40:09+5:302020-05-26T06:52:32+5:30

राज्यपालांकडे लक्ष

 Speed up movements in the palace; The meeting sparked a discussion | CoronaVirus News: राजभवनात हालचालींना वेग; भेटीगाठीमुळे चर्चेला उधाण

CoronaVirus News: राजभवनात हालचालींना वेग; भेटीगाठीमुळे चर्चेला उधाण

googlenewsNext

मुंबई : राज्यात एकीकडे कोरोनाचे संकट वाढत असताना दुसरीकडे राजभवनवरील हालचाली वाढल्या आहेत. राजकीय नेत्यांच्या भेटीगाठीचा सिलसिला सुरूच असून सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्याने चर्र्चेला उधाण आले.

शरद पवार यांना राज्यपालांनी आमंत्रित केले होते; त्यानुसार आम्ही गेलो. त्यात राजकीय चर्चा काहीही नव्हती. ही सदिच्छा भेट होती, असे पटेल यांनी स्पष्ट केले. मात्र सध्याच्या परिस्थितीत पवार यांनी राज्यपालांची भेट घेणे याकडे राजकीयदृष्ट्यादेखील बघितले जात आहे.
या भेटीनंतर काहीच तासात भाजपचे राज्यसभा सदस्य व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राजभवनवर राज्यपालांची सदिच्छा भेट घेतली. राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी आपण राज्यपालांकडे केली, असे त्यांनी नंतर पत्रकारांना सांगितले. राज्य शासन कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले आहे, त्यामुळे राष्ट्रपती राजवटीशिवाय पर्याय नाही, असे राणे म्हणाले.

विधानपरिषद निवडणुकीवरून राज्य सरकार आणि राजभवन यांच्यात झालेला सुप्त संघर्ष सदर निवडणूक बिनविरोध पार पाडल्यानंतर मावळला. मात्र, राजभवनसाठी स्वतंत्र आस्थापना असावी, असा प्रस्ताव राज्यपालांनी शासनाला पाठविला आहे. आता शासन काय भूमिका घेते आणि या मुद्यावरून राज्यशासन व राजभवनचे संबंध अधिक ताणले जातील काय, याबाबत उत्सुकता आहे. कोरोनासंदर्भात मुंबईसह राज्यातील परिस्थिती अधिक चिघळली तर राज्यपालांच्या भूमिकेकडे लक्ष असेल.

राऊतांची शिष्टाई की...

विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सहकुटुंब राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनवर गेले होते. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत हे राज्यपालांना जाऊन भेटले आणि राज्यपालांचे व उद्धव ठाकरे यांचे संबंध पिता-पुत्राप्रमाणे आहेत असे विधान त्यांनी केले होते. राज्यपालांशी राज्य सरकारचे संबंध ताणले गेले असताना शिवसेनेचा हा दिलजमाईचा प्रयत्न थोडा चकित करणारा होता. राज्यपालांवर निशाणा साधणारे राऊत हेच दिलजमाईसाठी गेल्याने त्याची अधिक चर्चा झाली.

भाजप नेत्यांची ऊठबस वाढली : गेल्या आठवड्यात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली होती आणि कोरोनासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारला निर्देश द्या, अशी मागणी केली होती. दुसऱ्याच दिवशी राज्यपालांनी राजभवनावर कोरोनाचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्या बैठकीला उपस्थित राहणार होते पण ते गेले नाहीत. शिवसेनेचे सचिव व ठाकरे यांचे निकटवर्ती मिलिंद नार्वेकर या बैठकीला उपस्थित होते. तसेच मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यासह वरिष्ठ अधिकारी होते. या प्रकारामुळे दुखावलेल्या राज्यपालांना सुखावण्यासाठी संजय राऊत गेले होते, असेही म्हटले जाते.

Web Title:  Speed up movements in the palace; The meeting sparked a discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.